
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगड, सहा.पोलीस आयुक्त गजानन खिल्लारे तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार आदी यावेळी उपस्थित होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्य आणि मदत प्रकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
माहे १ जानेवारी २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ अखेर दाखल प्रकरणे व अर्थसहाय्याची माहिती पोलीस विभागाची कारवाई सभेत सादर करण्यात आली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.त्यावर पोलीस तपासावरील प्रकरणे निकाली काढण्यास मा.उच्च न्यायालय यांना विनंती करुन या स्तरावरून याबाबत पाठपुरावा करावा,असे आदेश यावेळी देण्यात आले.
ज्या प्रकरणामध्ये जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही व त्याकारणाने दोषारोप न्यायालयात सादर करण्यास विलंब होत आहे, अशा १४ प्रकरणात जातीचे प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.वरील कायदया अंतर्गंत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती अद्याप तालुका स्तरावर स्थापन करण्यात आली नाही.यावर त्वरित कार्यवाही करून उपविभागीय समिती स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.