
दैनिक चालु वार्ता
कंधार – लोहा (विशेष प्रतिनिधी )
ओंकार लव्हेकर
नांदेड (25 डिसेंबर 2021):-संगीतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे व किनवट जवळ बोधडी सारख्या दुर्गम भागात राहून आयुष्यभर अंध व आदिवासी समाजात संगीताची दिव्य दृष्टी देणारे पं.वसंतराव शिरभाते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड येथे देगलूर निवासी बाल कलावंत अनहद वारसी व सुप्रसिध्द वेणू वादक ऐनोद्दीन वारसी (पं. बाबुराव उप्पलवार व पं. रोणू मुजुमदार यांचे शिष्य ) या कलावंत पिता पुत्रांचा बहारदार असा वेणू वादन कार्यक्रम संपन्न झाला.
आरंभी सुप्रसिद्ध गायक रत्नाकर आपस्तंब, संजय जोशी व मान्यवर कलावंत यांनी दीप प्रज्वलन केले.
सौ.परिणिता शिरभाते यांनी प्रस्तावनेत आपले सासरे वसंतराव यांच्या कार्याला अभिवादन करून काही कौटुंबिक आठवणी सांगताना ‘डोळस व्यक्तींना रंग, रूप, दिशा, आकार, सर्व काही दिसत असतं परंतु धन द्रव्य, पैसा अडका, घर दार यातच ते अडकून असतात, पण सासरे वसंतरावांनी दृष्टिहीन असताना सुद्धा आयुष्यात सतत सकारात्मक दृष्टिकोन जपला. त्यांनी संगीतावरील श्रद्धा व विश्वासाने अंध, अपंग आणि दलित आदिवासीं मुलांना संगीताची जाण करून देऊन दिव्य दृष्टी दिली’ असे सांगितले. त्यानंतर संगीत कार्यक्रमास आरंभ झाला.
आरंभी अनहद वारसी या आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या बाल कलावंताने आपल्या सहज सुंदर वेणुवादनाने आरंभीपासूनच मैफलीत रंग भरला. त्याने वेणूवर हंसध्वनी रागात तीनतालातील मध्य व द्रुत लयीत दोन रचना सादर केल्या. शंकरा व इतर काही रागांच्या जवळ असलेला राग हंसध्वनीची शुद्धता पाळीत सुंदर आलापी जोड मधेच रंगाचे स्वरूप सुंदर उलगडत , तालामध्ये विविध लयकरीमध्ये अप्रतिम जुगलबंदी सादर करून सर्वांना आश्चर्य चकित केले. राग हंसध्वनी नंतर राग किरवानी मध्ये सुप्रसिद्ध दिल कि तपीश ही रचना सादर करून रसिकांना मोहित केले. अनहद वारसी याच्या सुंदर वेणू वादन नंतर सुप्रसिध्द वेणू वादक ऐनोद्दीन वारसी यांनी राग बागेश्री सादर केला.
आरंभी आलापी जोड मध्ये सुपुत्र अनहद सह रागाचा विस्तार करताना स्वरलगाव , रागातील कणस्वर, षड्ज मध्यम मधील स्वरमेळ, अवरोहांतील पंचमचे वक्रस्वरूप अशा गोष्टी विलक्षण हरकतीयुक्त सादर केले कि या अनाहत नाद स्वरांचा मनापासून आनंद रसिकांनी घेतला. आलापी नंतर अवघड अशा नऊ मात्रेच्या मत्त तालामध्ये बागेश्री रागातील विलक्षण सुंदर अशी गत सादर करून कार्यक्रम खूप उंचीवर नेला. त्यानंतर पहाडी रागातील सुंदर धून सादर करून आपल्या बहारदार वेणुवादनाचा समारोप केला. कार्यक्रमाच्या शेवटी पं. वसंतराव शिरभाते यांनी वर्षापूर्वी अमृत महोत्सवात गायिलेल्या ‘उड जायेगा हंस अकेला’ या गाण्याची व्हिडीओ क्लिप दाखवून या संगीत आदरांजली कार्यक्रमाचा समारोप झाला.
या पितापुत्रांच्या वादनाला सुप्रसिद्ध तबला वादक प्रशांत गाजरे यांचा शिष्य युवा कलावंत अभिषेक देशपांडे याने अप्रतिम तबला साथ करून रंग भरला. विशेषतः तोडे व लयकारी मधील जुगलबंदीत बरोबरीने साथ करून हम भी कूछ कम नही असे दाखवले. या कार्यक्रमाचे आपल्या ओघवत्या शैलीत सुंदर असे सूत्र संचलन सुप्रसिद्ध निवेदक संजय देशपांडे यांनी केले. शेवटी भावपूर्ण शब्दात संयोजक असलेले पंडितजींचे सुपुत्र व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंकज शिरभाते यांनी आभार प्रदर्शन केले. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन डॉ. प्रमोद देशपांडे व स्वरेश देशपांडे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सौ. परिणिता शिरभाते, कु. गुंजन शिरभाते, सौ.पूजा देशपांडे, सागर ओझा, विश्वास आंबेकर व प्रा.डॉ. जगदीश देशमुख यांनी सहकार्य केले. असंख्य रसिक श्रोत्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहून संगीतानंद घेतला.