
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार:- जव्हार सारख्या ग्रामीण आदिवासी भागात महिलांच्या आरोग्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जव्हार येथे युवा मित्र व बजाज या संस्थांच्या संयुक्त आयोजनात संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषाताई पोटे,प्रकल्प व्यवस्थापिका सोनाली गुजराथी यांच्या उपस्थितीत “महिलांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन” या विषयावर प्रशिक्षण आयोजनाच्या कार्यक्रमात तालुक्यातील १३ पाड्यातील जवळपास १३० किशोरवयीन मुली व महिला उपस्थित होत्या.महिलांच्या आरोग्य विषयी तसेच ग्रामीण महिला ही नेहमी आपल्या कुटुंबाच्या देखभालीसाठी व्यस्त असते म्हणून आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे तिचे दुर्लक्ष होते.ती जागरूक व्हावी तसेच समाजात आपल्या आरोग्याबाबत संवेदनशील व्हावी या करिता सदर विषयाचे आयोजन करण्यात आले होते.
जव्हार सारखा ग्रामीण भाग असल्याने मासिक पाळी विषयी आणि स्वच्छता याबाबत खूप कमी बोलले जाते. स्वच्छतागृह,सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळी या बाबत अपुऱ्या माहितीमुळे अथवा साधनांमुळे आरोग्याचे गंभीर आजार उद्भवू शकतात त्यामुळे महिलांना मासिक पाळी म्हणजे काय? त्याची स्वच्छता, घ्यावयाची काळजी,आरोग्य,आहार-विहार व त्यांचे प्रकार,अंधश्रद्धा व गैरसमज आदी.विषयावर या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित महिलांशी संवाद साधून महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.या कार्यक्रमामुळे संबंधित विषयाकडे महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून भविष्यात नक्कीच बदल होऊन सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या प्रशिक्षणाच्या आयोजनात संस्थेचे समन्वयक कृष्ण बाजारे,योगेश अभंग,किरण गोरे,मुक्ता पोटे,आरोग्य सेविका यांचा मोलाचा वाटा राहिला.