
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
जबलपूर (मध्य प्रदेश) :- फेब्रुवारी 2022 मध्ये राजस्थानमधील बाडमेर या जिल्ह्यात खो-खो क्रीडा विश्वचषकाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती राजस्थान खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष असगर अली यांनी दिली.भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.जबलपूूर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या वरिष्ठ पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील खो-खो संघटक आणि क्रीडाप्रेमी सध्या एकत्र आले आहेत. करोनामुळे काही काळ खो-खोच्या प्रगतीला खीळ बसली. परंतु राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा खो-खोची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे महासंघाने खो-खोचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करण्यासाठी पावले उचलली आहेत.
‘राजस्थानमध्ये खो-खोला उत्तम प्रतिसाद लाभत असून यापूर्वीही आम्ही राष्ट्रीय तसेच भारत-नेपाळ, भारत-इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय खो-खो सामन्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र शासनाशी यासंबंधी चर्चा झाली असून करोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात अडथळा आला, तरी पुढील वर्षीच एखाद्या महिन्यात विश्वचषक नक्की रंगेल,’ असे अली म्हणाले.
‘भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर हा जिल्हा कच्चे तेल आणि पेट्रोलच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. तेथील ‘केर्न’या तेल उत्पादन कंपनीने या स्पर्धेसाठी स्वत:हून २ कोटींची मदत करण्याचे ठरवले आहे.आंतरराष्ट्रीय खेळाडू यानिमित्ताने राजस्थानमध्ये येणार असल्याने बाडमेरमधील स्टेडियमसह अन्य व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात महासंघाचे पदाधिकारी येणार आहेत,” असेही अली यांनी सांगितले. याव्यतिरिक्त पाऊस अथवा अन्य कोणत्याही कारणांमुळे विश्वचषकावर प्रभाव पडू नये, म्हणून सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये मॅटवरच प्रामुख्याने खेळवण्यात येतील, अशी माहितीही अली यांनी दिली.