
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :-पंतप्रधान आवास योजना गोरगरिबांना राहण्यासाठी घरे मिळावीत म्हणून सुरू करण्यात आली खरी, परंतु सर्वेक्षण करतांना केलेल्या घोळामुळे काही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याचे चित्र समोर येत आहे.लोहा तालुक्यातील मौजे बेरळी खुर्द गावातील भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकार्यांवर व ग्रामपंचायत कार्यालयाच्या ऑपरेटरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत मधील प्रपत्र ड घरकुल लाभार्थी घरापासून वंचित असून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अनेक घरकुलांचा चुकीचा सर्वे करुन भूमिहीन लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे घरी बसुन सर्वे करण्यात आला असल्याचे आरोप माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे लोहा तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांनी केला आहे. हा सर्वे ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मौजे बेरळी खुर्द गावातील अनेक कुटुंबे पंतप्रधान घरकुल योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. परंतु लोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या घरकुलच्या ‘ड’ यादीचा ग्रामपंचायत ऑपरेटर व सचिवांनी सर्वे करते वेळी दुजा भाव करून खरे लाभार्थ्यांना डावळुन त्यांचे ऑनलाईन केले नाही.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ‘ड’ यादीनुसार खरे लाभार्थ्यांचे नाव सुटल्याने घरकुलच्या “ड” यादीत मोठा घोळ झाला आहे. तरी तात्काळ दुरुस्ती करून ग्रामपंचायच्या ठरावा नुसार ‘ड’ यादीतील नाव सुटलेला लाभार्थीचे ऑनलाईन करून गर्जूवंत लाभार्थींना “ब” यादीत समावेश करण्याची मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे लोहा तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्देयांनी केली आहे.
तालुक्यातील बेरळी खुर्द,रिसनगाव, आदी गावात नाव सुटलेल्या लाभार्थी बरोबर सरपंच यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत. ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांना पूर्वी घरकुलाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजना तयार केली आहे. परंतु, तालुक्यातील बेरळी खुर्द येथील अनेक लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते. अनेकांना पक्के घर असूनही घरकुलाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्या, कच्च्या घरातच दिवस काढावे लागत आहेत.
खोट्यांना लाभ,खरे वंचित सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण काहीजणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्र्यरेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकुल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. तालुक्यात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौक करण्याची मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने केली आहे