
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
औरंगाबाद / जालना/हिंगोली : मराठवाड्याच्या काही भागांत मंगळवारी गारपीट झाली (. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे (. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, गंगापूर तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. हिंगोलीसह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारात ऊस काढणीसाठी कन्नड व तीसगाव येथून आलेल्या नऊ कुटुंबांना अवकाळी गारपिटीचा चांगलाच फटका बसला. पाल उडून गेल्याने या कुटुंबाला गारपिटीचा मार सहन करावा लागला. पालावरील जीवनावश्यक वस्तू व अन्यधान्याची नासाडी झाल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तालुक्यातील वाहेगाव, सिद्धपूर, जामगाव, कायगाव, भेंडाळा, अंमळनेर शिवारात शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा, लोहगाव, बालानगर, जायकवाडी, टाकळी पैठण, पाचोड, कडेठाण, लिंबगाव, ढाकेफळ, अमरापूर वाघुंडी, मुलानी वाडगाव, तोंडोळी, ७४ जळगाव, लामणगाव, ब्रम्हगव्हाण, जोगेश्वरी, खादगाव, विहामांडवा, थेरगाव आदी परिसराला मंगळवारी दुपारी चारनंतर वादळी वारे, गारांसह पडलेल्या पावसाने झोडपून काढले. यासह दावरवाडी, रांजणगाव खुरी, चितेगाव, बिडकीन परिसराला पावसाने झोडपले. कन्नड तालुक्यातील पिशोरमध्येही गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने गहू व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले.
जालन्यात वीज कोसळून बैल ठार
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. खरीप हंगामातील गहू, मका पिके आडवी झाली, तर वालसावंगी येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला. वालसावंगी, पद्मावती, पारध, अवघडराव सावंगी, सुंदरवाडी, सिपोरा बाजारसह आदी भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला व मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली.
हिंगोलीत विजांचा कडकडाट
हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपासूनच विजांचा कडकडाट सुरू झाला. कळमनुरी,औंढा नागनाथ, डिग्रस कऱ्हाळे, खुडज आदी ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली.येत्या २ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची ,किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे.