
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पणजी :- माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या फिल्ड आऊटरीच ब्युरो आणि एनसीसीच्या ‘पुनीत सागर’ अभियानाअंतर्गत आज मिरामार समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.पुनीत सागर अभियानाविषयी माहिती देताना कर्नल एमकेएस राठोड म्हणाले की, गोव्यात सुमारे 3,000 कॅडेटसनी दक्षिण आणि उत्तर गोव्यात आयोजित समुद्रकिनारी आणि मांडवी नदी किनारी असलेला कचरा, प्लास्टीक बाटल्या गोळा करुन महापालिकेच्या सहाय्याने त्याची विल्हेवाट लावली.
फिल्ड आऊटरीच ब्युरोच्या कार्याविषयी माहिती देताना क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाज बाबू यांनी माहिती दिली की, विविध अभियानाच्या माध्यमातून राज्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी कार्यशाळा, महिला बचत गटांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.तत्पूर्वी आज सकाळी महिला बचत गटांनी पणजी महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. मिरामार किनाऱ्यावर फिल्ड आऊटरीच ब्युरोच्या वतीने लघुनाटिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.