
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार:- स्टुडंट ऑलिम्पिक स्टेट गेम मध्ये ४९ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत नाशिक येथील दांडेकर दीक्षित तालीम संघाची व जव्हारच्या के.व्ही हायस्कूल मधील इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुस्तीपटू सानिका सचिन दातखिळे हिने सोलापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सोनेरी किमया साधली. सानिकाचे वडील सचिन दातखिळे हे एस.टी महामंडळ जव्हार आगारात चालक या पदावर कार्यरत असून सानिकाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सुवर्ण विजेती सानिका हिची भेट घेऊन तिचा सत्कार केला व भविष्यात तिला कुस्ती खेळण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली. तर युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या संस्थेने जव्हार येथील सानिकाच्या राहत्या घरी जाऊन तिच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि जानेवारी महिन्यात पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार असून संस्थेचे अध्यक्ष मुकेश वातास यांनी सानिकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कुस्तीगीर सानिकाला नाशिक येथील दांडेकर दीक्षित तालीम संघाचे अध्यक्ष हिरामण वाघ,पहिलवान संदीप निकम,हिरामण चौधरी,ज्ञानेश्वर बेंडकुळे,तात्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सानिकाने सुवर्ण वेध घेतला.सानिकाने मिळवलेल्या या यशाने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.