
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधि
मोहन आखाडे
शिऊर :- श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव निमित्ताने भरणारा शिऊर येथील यात्रोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून शिऊर गावाचा लौकिक आहे,गेल्या दोन वर्षापासून कॊरोना महामारीने सर्व व्यवहार ठप्प झाले, यात सामूहिक संसर्ग होऊ नये यासाठी बाजार,यात्रोत्सव बंद करण्यात आले, हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येऊन अनलॉक होत नाही तोच कोरोनाचा नवीन विषाणू पसरला जात असल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे. सलग तिसऱ्या वर्षीही यात्रोत्सव रद्द झाल्याने व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली, तर यात्रेकरूंचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान श्री संत शंकरस्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्ताने भरणारी यात्रा रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे होणारे धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम योग्य खबरदारी घेत संपन्न होत आहे यात समाधी पूजन, कीर्तन, प्रवचन, पालखी मिरवणूकीचा समावेश आहे. शिऊर येथील बाजारतळ परिसरात ही यात्रा भरली जाते, मात्र सलग तिसऱ्या वर्षीही या परिसरात सन्नाटा असून समाधी दर्शन साठी भाविक येत आहे.