
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद महानगरपालिकेच्या संत एकनाथ रंग मंदिराच्या नूतनीकरण आणि दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नूतनीकरण आणि दुरूस्तीच्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष केली.या पाहणी दरम्यान मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता एस.डी.काकडे, ए.बी.देशमुख, नाना पाटील, वास्तूविशारद प्रदीप देशपांडे आदींची उपस्थिती होती.
कलाकार, नाट्यकर्मी, कलाप्रेमींसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणाऱ्या संत एकनाथ रंग मंदिरामुळे शहराच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अधिक भर पडणार आहे. 2022 या वर्षात कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांसाठी महापालिकेचे संत एकनाथ रंग मंदिर खुले होणार आहे. सर्व सोयींयुक्त करावयाच्या या संत एकनाथ रंग मंदिरासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून (डीपीसी) पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात आलेला आहे. आता नूतनीकरणानंतर संत एकनाथ रंग मंदिराची आसनक्षमता 751 झालेली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट आणि उत्तमप्रकारच्या सर्व सोयींयुक्त रंग मंदिर कलाकारांसह प्रेक्षकांनाही अनुभवता येणार आहे.
रंग मंदिरात सेंट्रलाइज्ड एसी, उत्तमप्रकारचे स्टेज, ध्वनी यंत्रणा, रंगरंगोटी, कार्पेट, अग्नीशमन सुविधा, ग्रीन खोल्या, सीसीटीव्हीतून निगराणी आदी उत्तम प्रकारच्या सुविधा या रंग मंदिरात कलाकार, कलाप्रेमी आणि रसिकांसाठी असणार आहेत.लवकरच संत एकनाथ रंग मंदिर कलाकार, प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याचा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना यावेळी दिला.