
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
१ जानेवारी १८४८ रोजी स्त्री शिक्षणाची सुरुवात या वास्तूत म्हणजे भिडेवाड्यात झाली .त्या दिवशी माझा आनंद गगनात मावत नव्हता.स्त्री शिक्षणाची ज्योत भिडेवाड्यात प्रज्वलित होत होती.संपूर्ण भिडेवाडा प्रकाशमय झाला होता.माझी छाती आभिमानाने फुलली होती.माझं मन आनंदानं डोलत होतं ,कारण स्त्री शिक्षणाच्या क्रांतीला सुरुवात भिडेवाड्यापासून झाली होती .हे माझ्यासाठी गौरवाचं आणि भूषणाचं होतं.या क्रांतीमुळे माझ्या अस्तित्वालाही धोका होता.स्त्री शिक्षणाला अनेक लोकांनी कडाडून विरोध केला.स्त्रियांची चौकट चूल आणि मूल एवढीच मर्यादित आहे,असं सांगणारे लोक काही कमी नव्हते.
स्त्री शिकली तर अक्षरांच्या आळ्या होऊन पतीच्या ताटात येतात.पतीला अकाली मृत्यू येतो.अशा अनेक खुळचट समजुती आणि अंधश्रद्धा समाजात निर्माण केल्या होत्या.त्यामुळे स्त्री शिक्षणाला प्रखर विरोध झाला;पण मी माझ्या मतावर ठाम होतो.स्त्री शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं.माझ्या अस्तित्वाला धोका होता;पण या सर्व परिणामांची पर्वा न करता स्त्री शिकली पाहिजे या मतावर मी ठाम होतो.स्त्री शिकली तरचं तिचे हक्क …तिचे स्वातंत्र्य ….तिचे अधिकार ….तिला मिळणार होते.समाज परिवर्तन घडून समाज प्रगतीच्या मार्गावर निश्चित पुढे जाईल आणि त्याच्या परिणाम तसा झालाही….आज असं कोणतहीक्षेत्र नाही की,ज्या क्षेत्रात स्त्री नाही.आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग करुन स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात नाव कमावून आर्थिक आणि सामाजिक बाबतीत स्वावलंबी झाली आहे.या गोष्टीचा निश्चितच आनंद माझ्या मनात आहें;पण या आनंदासोबत तेवढीच तीव्र वेदना,व्यथा,व्याकुळता,दुःख,यातना होत आहेत;कारण स्त्री शिक्षण क्रांतीचं भूषण सांगणारा मी(भिडेवाडा) आज मात्र अस्वस्थ आहे.व्यथित होऊन अश्रू ढाळतोय.माझा श्वास गुदमरतोय.अनेक ठिकाणी माझी झालेली पडझड पाहून मी स्वतः दुःखी झालोय.एका खांबावर कसाबसा स्वतः ला सावरुन उभा आहे.
समाजातील माणसांचा प्रखर विरोध सहन करुन स्त्री शिक्षणाची पाळेमुळे आपल्या वास्तूत रुजवणारा,स्त्री शिक्षणाला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. का समाजातील लोकांना असं वाटत नाही? या वाड्यातील स्त्री शिक्षणाची स्पंदन जतन करावीत.सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी स्त्री शिक्षणासाठी हिरहिरीने भाग घेणारा भिडेवाडा…आज मात्र वाट पाहतोय….स्वतःच्या हक्कासाठी ….. अस्तित्वासाठी…… आधारांच्या हातांची …..माझा कोंडलेला श्वास मला मोकळेपणाने घ्यायचाय…
श्रीमती शुभांगी भोसले.
पुणे.