
दैनिक चालु वार्ता
मिरज तालुका प्रतिनिधी
पोपट माने
आरग :- आरग (ता.मिरज) येथील ग्रामपंचायत मध्ये
उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले विनोद सिद्राम बुरुड यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अखेर जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांनी रद्द केले.तसेच जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय समितीने दिला आहे.याबाबत तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रभाकर दुर्योधन कांबळे, प्रशांत हरी कांबळे,दिपक अविनाश कांबळे,विकास विठ्ठल कांबळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी
ॲड.संदीप रजपूत यांच्या मार्फत समितीकडे सुरू होती.
बुरुड यांनी १० जुलै २००३ रोजी जात प्रमाणपत्र काढले होते.आरग ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक झाली. वॉर्ड क्र.एक मधून अनुसूचित जाती या राखीव जागेतून जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून बुरुड विजय झाले होते.समितीने बुरुड यांना सहा महिन्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती.
परंतु, बुरुड यांनी वंशावळ सिद्ध होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याने अखेर जात प्रमाणपत्र अवैध बोगस असल्याचा आदेश जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला.तसेच अनु.क्र.८ अन्वये जातीचा जातीदावा सिद्ध होत नसल्याने तो अमान्य करण्यात आला.तसेच बुरूड यांचे जात प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करून जात प्रमाणपत्र जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असें समितीच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.