
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
झारखंड :-सध्या देशातील जनता महागाईने होरपळून निघत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. अशातच झारखंड सरकारने मोठा निर्णय घेतला असून दुचाकी चालकांना नववर्षांची भेट दिली आहे. आता दुचाकी चालकांना पेट्रोलच्या दरात मोठा दिलासा मिळणार आहे.दुचाकी चालकांना पेट्रोलवर २५ रुपये सवलत देण्याचा मोठा निर्णय झारखंड सरकारने घेतला असून याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज घोषणा केली आहे. या योजनेची २६ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
का देण्यात आली सवलत ?
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे गोर-गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे झारखंड सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला फायदा मिळावा या हेतूने ही योजना आणली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हा गरीब जनतेला देण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात अशी सवलत कधी देणार ?
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून काही प्रमाणात का होईना जनतेला दिलासा देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यांनी इंधनावरील कर कमी करून त्यांच्या राज्यातील जनतेला आणखी दिलासा दिला होता. त्याचवेळी महाराष्ट्रात देखील इंधनावरील दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, खुद्द सरकारमधील मंत्र्यांनीच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. इतर सरकारने इंधनावरील कर कमी केल्यानंतर महाराष्ट्र सरकार कशाची वाट पाहतंय? असा प्रश्न देखील वारंवार विचारला जात आहे.