
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
मुंबई :महाराष्ट्र विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील धोकादायक व जीर्ण पुलांचा विषय उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने अशा सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि सर्व मुख्य अभियंते व अधिक्षक अभियंत्यांसमवेत बैठक घेतली. धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन नव्याने उभारण्यात येणारे पूल आणि दुरुस्ती करावयाच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या ज्या पुलांच्या कामाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, ते पूल आणि ज्या पुलांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा सर्व पुलांचे स्ट्रकचरल ऑडिट करणे, नवीन पूल बांधत असताना त्या-त्या भागातील सर्वाधिक पर्जन्यमान लक्षात घेऊन त्याची उंची पूर पातळीपेक्षा अधिक असेल याकडे लक्ष देणे, पुलाचे डिझाईन करताना बंधारा टाईप पूल बांधणे जेणेकरून जलसंधारणाचा हेतू देखील सफल होईल, आदी निर्देश या बैठकीत दिले.
पुढील काळात पुलांची उभारणी करताना त्यात सौंदर्यदृष्टी, वापरकर्त्यांसाठी सुविधा यासह पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करावा आणि सौरउर्जेची निर्मिती करण्यासारख्या संकल्पनेवरही अभियंत्यांनी अभ्यास करण्याच्या सूचना देऊन रस्ते किंवा पूल बांधणी करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच फायबर कॉंक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विभागात किमान एका पुलाची उभारणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना यावेळी दिली.
कोकणात अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देशही दिले. अशी माहिती माजी मुख्यमंत्री व वि.सां.बांधकम मंत्री मा.अशोकरावजी चव्हाण यांनी दिली.