
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.१ जानेवारी १८१८ ला पेशवाई चा खात्मा करणारी गोष्ट म्हणजे “भीमा कोरेगाव शौर्य दिन” तसेच १ जानेवारी १८४८ ला फुले दाम्पत्यांनी सुरु केलेली “पहीली मुलींची शाळा” (भिडेवाडा पुणे) म्हणजे “शिक्षण क्रांती दिन” ह्या घटना स्त्रियांना दास्यत्वातुन मुक्त करणाऱ्या व सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याची जाणीव करणाऱ्या घटना आहेत.
नववर्षात पदार्पण करतांना आम्हाला आमच्या इतिहासाची आठवण होणे फार आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी शिवशाही संपुष्टात आणली. पेशवाईत अस्पृश्यांच्या गुणवत्तेस अत्यंत अल्प मूल्य व वाव होता. या कालखंडातील सर्व पेशव्यांनी महार आणि इतर सर्वच अस्पृश्य लढवय्या जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या शौर्याचे केवळ काठी, तोडे, कडे इत्यादी नगण्य इनाम म्हणून देऊन कौतुक केले. कधी कधी तर फक्त शाबासकी दिली जात असे.
स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणाऱ्या शुर वीरांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारतखंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला; पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही. बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. पुन्हा सरदारकी बहाल केली; परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवण्याचा जागतिक विक्रम केला .
अशा अनेकानेक पशुतुल्य अन्याय, अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्या वेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून बाजीराव पेशव्यांना विनंती केली होती की पेशवाईत महार आणि इतर अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमी साठी प्राण देण्यास तयार आहेत; पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती . म्हणून महारांची संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध अत्यंत शौर्याने व द्वेषाने लढले.
प्राणांची आहुती देऊन अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांचा अभूतपूर्व पराभव केला.यावरून स्पष्ट होते की महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता, अस्मिता यासाठी होती. अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते.
1जानेवारी 1818 हा दिवस आमच्या स्वाभिमान क्रांतीलढ्याचा दिवस होय. इंग्रजांच्या राजवटीत पेशवाई च्या विरूध्द महार रेजिमेंट सैनिकांनी युध्द केले. या युध्दात पेशवाईला हद्दपार करून जुलमी, अन्यायी, अत्याचारी, माणुसकीला काळीमा फासणारी पेशवाई नष्ट केली. या लढाईत शूर पराक्रमी महार रेजिमेंट च्या 500 सैनिकांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी “विजयस्तंभ” उभारण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येत असत.
आपल्या या ऐतिहासिक वारसा लढ्याला मानाचा मुजरा व मानवंदना वंचित बहुजन आघाडी शहर जनसंपर्क कार्यालय बुलडाणा यांचे वतीने देण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष मिलींद वानखडे, महासचिव दिलीप राजभोज, आर.एल.नरवाडे काका, शेख अकील अहमद, शेख इरफान शेख कासम, जावेद खान यूसफ़ खान, मो.मुज्जमील मो.अकील, सचिन वानखडे, तेजस मोरे, आकाश हिवाळे, वैभव हिवाळे, मनोज मोरे, वैभव भिमराव हिवाळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.