
दैनिक चालु वार्ता
लोणखेडा सर्कल प्रतिनिधी
हिम्मत बागुल
नंदुरबार :-शहरातील घरांप्रमाणेच घरकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता होत असून, घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या घरकुलमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उर्दू शाळा चालविण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, फारुख मेमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, पालिकेचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, घरकुलातील पालकांनी त्यांच्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवावे. शाळेत शासकीय नियमानुसार शालेय पोषण आहाराचे वाटप होईल. नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. मुस्लिम समाजातील मुले एक्सपर्ट आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेतील मुलांना दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले. ३ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम ते पुढे म्हणाले,घरकुलात शाळेच्या सुविधेसह जमातखाना,६ गाळ्यांचे व्यापारी संकुल व ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे. घरकुल वसाहत ही आपली वास्तू असून, तीचे जतन करणे रहिवाशांचे कर्तव्य आहे.
कमी भाड्यात दुकाने उपलब्ध परिसरातील नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरकुलात सहा गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. दुकान कमी भाड्यात देण्यात येतील असे रघुवंशी यांनी सांगितले.