
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
लोहा :- माणसाला जन्म घालणे देवाच्या हातात असते पण त्यांच्या कर्तव्याने मोठा होतो. इतरांच्या समोर आपला आदर्श निर्माण करतो. जनतेच्या मनात घर करणारे समाजा वर प्रेम करणारे स्वभावातील नम्रता, सदाचार या गुणामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. असा आपला आदर्श वाटणारा आजचा दिवस म्हणजे कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांचा जयंती सोहळा.कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांचा जन्म लोहा तालूक्यातील कलंबर (खु.) या छोटयाशा खेड्यात एका सामान्य शेतक-याच्या कुटूंबात वडिल बळीराम पाटील आई जिजाबाई यांच्या पोटी 4 जाने. 1955 रोजी झाला. “मुलाचे पाय पाळल्या दिसतात”. या म्हणीप्रमाणे कलंबरच्या भूमीमध्ये लोकसेवेचा वसा घेऊनच जन्माला आले.
हिमालयासारखे उतुंग व्यक्तीमत्व आणि खोल वैचारिकता हे गुण उपजतच त्यांच्या अंगी होते. बालपणापासूनच चिकाटी आणि जिज्ञासू वृत्ती त्यांच्या अंगी भिनलेली होती. स्वभावातील रुजुपणा व मनमिळावू वृत्तीमुळे समाजाच्या मनातील अधिराज्य बनले. असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड. कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कलंबर (बु.) येथे झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालय येथे झाले.
प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांच्या बालमनावर वडिलांनी केलेले संस्कार पक्के अंगी बिंबविले होते. त्यांचे वडिल गावातील तंटामुक्ती, गोरगरीबांना मदत करणे, अडीअडचणी सोडविणे या गुणांचा वारसा मिळाला.शाळेमधुनच त्यांच्या राजकीय जिवनांची जडणघडण झाली. ” माशांच्या पिल्लांना पोहायला शिकवावे लागत नाही.” या म्हणीप्रमाणे कै. निवृत्तीराव पाटील कॉलेज जिवनात अध्यक्ष, वर्ग प्रतिनीधी यांच्या निवडणुका लढवीत असत. कर्तृवान व्यक्तीचा सहवास उपयुक्त ठरतो. काँग्रेस पक्षाचा व विचारसरणीचा प्रभाव त्यांचा राजकीय पिंड घडण्यास उपयुक्त ठरला.
महात्मा गांधीच्या विचाराचा प्रभाव पडला. यातूनच बहुआयामी व्यक्तीमत्व उदयास आले.शिक्षण घेत असताना गोरगरिबांच्या मुलांचे हाल पाहून त्यांचे मन हेलावत होते. गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत यांचे शल्य त्यांच्या मनात सारखे बोचत होते. B.A. चे शिक्षण पूर्ण करुण पुढे जी.डी.सी. व डी.एल अॅन्ड ए. डिप्लोमा पूर्ण केला. तरी त्यांचे मन त्यांना स्वस्त बसू देईना. कलंबर परिसरातील गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी त्यांच्या मनात समाज उन्नती शिक्षण संस्था स्थापनेचे बीज पेरले गेले.
1983 मध्ये कलंबर (खु.) येथे समाज उन्नती शिक्षण संस्था स्थापन केली. 1)मागासवर्गीयाच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करावी.2)खेड्यापाड्यातील अशिक्षित समाजाच्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण करावी. 3) सर्व स्तरांतील मुला मुलींना शिक्षणातील आवड निर्माण करावी. 4) शैक्षणिक शाखाचा विस्तार करून शिक्षणाची संधी घरापर्यंत आणावी या उद्देशाने समाज उन्नती शिक्षण संस्थेची स्थापना केली.समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संजय गांधी मा. व उमा. विद्यालय कलंबर. गणपतराव मोरे विद्यालय किवळा व संत मोतीराव हायस्कुल कारेगाव या शाळेची स्थापना केली.
शाळेसाठी समाजातील तळागाळातील व्यक्तीची मदत घेतली.”इवलेसे रोपटे लावलेया दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या संताच्या उक्तीप्रमाणे समाज उन्नती संस्थेचे जाळे पसरले शाळेमध्ये गुणवंत शिक्षकाची नेमणूक करून पवित्र ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. यावरून त्यांचा गुणग्राहकपणा दिसून येतो. वडिलांना पूर्वीपासूनच शिक्षणाची आवड होती. आपला मुलगा खूप शिकावा असे त्यांना वाटत होते. हा वसा वडिलांकडून मिळाला. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षित करण्याचे शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नावाने कलंबर येथे कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळा स्थापन केली. एवढ्यावरच न थांबता शिक्षकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी कै. बळीराम पाटील शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थांची स्थापना केली. त्यांच्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास होता. त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये गोडवा होता. प्रसंगी कै. निवृत्तीराव पाटील कुसुमापेक्षाही मृदु होत असत. कुणी चुकलेतर वजरापेक्षाही कठोर होत असत. ज्ञान, समाजसेवा व राजकारण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कै. निवृत्तीराव पाटील यांचे भक्तीमत्त्व होते. ते नेहमीच म्हणत, “संकट म्हणजे देवाने आपल्या समोर ठेवलेली संधी आहे.” संकटाच्या वेळी जसे सामान्य पक्षी आसरा शोधतात पण गरुड संकटावर मात करतो त्याप्रमाणे कै. निवृत्तीराव पाटील संकटावर मात करीत असत.
कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. कंधार / लोहा तालुक्यामध्ये काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रसिद्धी होती. कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. तसेच काँग्रेस सेवादलाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, विद्यमान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांचे समर्थक होते. समाजा मध्ये अन्यायाविरुद्ध उठाव करणारे क्रांती सूर्य होते. म्हणून त्यांना समाजात अभय साधक म्हणून ओळखत होते. त्यांच्या अंगी धार्मिक वृत्ती होती. मुत्सद्देगिरी व्यक्तीमत्व होते.
समाजातील उपेक्षितांचे आधारस्तंभ होते. कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांना सहकार क्षेत्राचे चांगले ज्ञान होते. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक त्यांना पाहवत नव्हती, म्हणून त्यांनी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत असत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य चांगले होते. समाजावर, गावावर त्यांची पक्कड होती. पंधरावर्ष गावचे सरपंचपद सांभाळले. सरपंच असताना गावाचा विकास घडवून आणला. पाणी, लाईट, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. राजकारणावर त्यांचे वर्चस्व होते. त्यांच्या नैतिक वजनापुढे राजसत्ताही नतमस्तक होत होती.
कलंबर येथे विद्यापीठीय शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील मुला-मुलींना उपलब्ध करून देण्याचे स्वप्न होते. ‘झोपेत पडलेली स्वप्न नसतात, “झोपू न देणारे स्वप्न असतात. कै. निवृत्तीराव पाटलांना झोपू न देणारी स्वप्न पडत असत.” त्यांची दूरदृष्टी होती. कलंबर येथे राजीव गांधी सिनिअर कॉलेज हा प्रस्ताव औरंगाबाद विद्यापीठाकडे पाठविला होता. पन नियतीचे कौर्य, परमेश्वरांचे बेत, काळाचा घाला हा कुणाला चुकला नाही कळला नाही. कळपातील मृगावर वाघाने झडप घालावी तशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांना आमच्यातून 5 एप्रिल 1994 रोजी अहिरावून नेले. सिनिअर कॉलेजचे स्वप्न अधूरे राहिले.
घोरबांड कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, समाजाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला. कै. निवृत्तीराव पाटलांच्या मृत्यूनंतर हिमालया एवढे दुःख बाजूला सारून त्यांच्या पत्नी मुद्रिकाताई घोरबांड यांनी समाज उन्नती शिक्षण संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. साहेबांचे राजीव गांधी सिनिअर कॉलेजचे स्वप्न टिळक विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण केले.त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचे काम त्यांचे सूपुत्र समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोती पाटील घोरबांड करतात. साहेबांचे अपुरे राहिलेले स्वप्न साकार करत आहेत. कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या जयंती निमित्त शत: कोटी विनम्र अभिवादन.
प्रा. गोविंद कोंडीबा शेट्टे
संजय गांधी ज्यु. कॉलेज कलंबर, ता. लोहा जि. नांदेड
मो.न.-9922049370