
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
येथील प्रसिद्ध कवी व सामाजिक कार्यकर्ते डॉ .संजय बालाघाटे यांच्या ‘न्हांगूळ आदार ईला ‘ या कवितासंग्रहास आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळच्या वतीने प्रा. सतेश्वर मोरे काव्यलेखन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी ही नोंदणीकृत संस्था असून १९९७ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. अकादमी तर्फे मराठी भाषेत प्रकाशित साहित्यकृतींना अर्थात कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, लेखसंग्रह, वैचारिक लेखन यासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. महाराष्ट्रातील नामवंत आंबेडकरी साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे यांचे नुकतेच देहावसान झाले त्यामुळे आंबेडकरी साहित्य चळवळीची फार मोठी हानी झाली.
दिवंगत प्रा. मोरेंना आंबेडकरी साहित्य व कला अकादमीची विशेष मानवंदना म्हणून २०२१ चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार योजनेची घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार दिनांक १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान प्रकाशित सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाला प्रदान केला जाणार होता. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून तब्बल ४५ काव्यसंग्रह प्राप्त झाले. यातील बहुतांश काव्यसंग्रह दर्जेदार होते, मात्र गुणानुक्रमानुसार पाच काव्यसंग्रह थोड्याफार फरकाने समांतर होते. न्हांगुळ आदार ईला (संजय बालाघाटे), मी संदर्भ पोखरतोय (पवन नालट), मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं (हबीब भंडारे), प्रश्न पाणी बदलण्याचा आहे (विद्याधर बनसोड), माणूस झाड आणि माती (सुनंदा बोदिले),डोहतळ (मारुती कटकधोंड) या काव्यसंग्रहात चुरस होती. त्यात न्हांगुळ आदार ईला या काव्यसंग्रहाने बाजी मारली.
पुरस्काराची रोख राशी १५०००/- रुपये, सन्मानचिन्ह, शॉल, आणि सन्मानपत्र असे स्वरूप असून दिवंगत सतेश्वर मोरे यांच्या स्मृती दिनी २ मार्च २०२२ रोजी हा पुरस्कार यवतमाळ येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. उपरोक्त पुरस्काराची निवड साहित्यक्षेत्रातील मान्यवरांच्या निवड समितीद्वारे करण्यात आली असून सुप्रसिद्ध नाट्यलेखक व समीक्षक प्रा. डॉ. शांतरक्षित गावंडे, नामवंत गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत, सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व विचारवंत संदेश ढोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याची माहिती गोपीचंद कांबळे, आनंद गायकवाड, कवडू नगराळे, सुनील वासनिक, इंजि. संजय मानकर, सतीश राणा, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, प्रा. विलास भवरे, प्रा.डॉ. संदीप नगराळे, इंजि. भीमराव गायकवाड, सुमेध ठमके, आनंद धवने, इंजि. निलेश सोनटक्के यांनी डॉ .बालाघाटे यांनी कळविली . या सन्मानाबद्दल डॉ . संजय बालाघाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.