
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
आज दर्पण दिन अर्थात पत्रकारितेचा गौरव दिन, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली पत्रकारिता आता वेगळ्या रंग-ढंगात मार्गक्रमन करत आहे. या दरम्यान पत्रकारितेत झालेला बदल कमालीचा असून शहरी पत्रकारितेसह ग्रामीण पत्रकारिता आता आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहे, डिजिटल, अत्याधुनिक साहित्य व योग्य व्यासपीठ मिळत असल्याने गाव, तालुका, जिल्हा , राज्य किंबहुना देश पार करून ग्रामीण पत्रकारिता परदेशात आपला डंका वाजवत आहे, याला अत्याधुनिक सोशल मीडियाचा भक्कम आधार ही मोठी उपलब्धी आहे.
महाराष्ट्राला ध्येयवादी,निर्भीड पत्रकारितेची गौरवशाली परंपरा आहे, ही परंपरा पुढे घेऊन जात, शब्दांना सत्याची धार देत राज्यातील मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करत पत्रकारिता बहरत राहीली आहे, यातील लेखनातून जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीला,समाजाच्या सर्वसमावेशक विकासाला नक्कीच नवी दिशा मिळत गेली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता ही नेहमीच ध्येयवादी राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाची पारतंत्र्यातून मुक्ती हे मुख्य ध्येय होते.
नंतरच्या काळात लोकप्रबोधन, अनिष्ठ रूढी-परंपरांचे उच्चाटन,समाजाच्या सर्वागीण विकासाला गती, यासारखी अनेकाविध उद्दिष्टय़े नजरेसमोर ठेवून मराठी पत्रकारिता पुढे जात राहिली. मराठी पत्रकारितेत आपले स्थान निर्माण करत असताना, राज्यातील प्रत्येक वृत्तपत्राने आपली वैचारिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ही वैचारिक बांधिलकी त्या त्या वृत्तपत्राची ओळख बनली, काळानुसार पत्रकारिता हायटेक होत राहिली अन डिजिटल तंत्रज्ञानाचा साहाय्याने गावकुसातील अपडेट तात्काळ दर्शकापर्यत पोहचायला लागली.
केवळ वृत्तपत्र नाही तर न्यूज चॅनल, यु ट्यूब चॅनल, वेब न्यूज,न्यूज पोर्टल, या माध्यमातून अपडेटची दर्शक- वाचकांना सवय लागली , तात्काळ अपडेट देणाऱ्या पत्रकारितेमुळे दर्शकांची भूक भागू लागली. ग्रामीण भागातील पत्रकारिता पहिले केवळ एका चौकटीत बंदिस्त होती, गाव व खेड्यातील प्रश्न , समस्या ह्या छापून यायच्या व त्याला देखील “ग्रामीण” मध्येच स्थान असायचे. कित्येक वृत्तपत्रांनी शहर वेगळे व ग्रामीण वेगळे असे प्रयोग देखील केलेले आहे, आता मात्र ह्या ग्रामीण पत्रकारितेने कात टाकली असून , परदेशात बघितल्या जाणाऱ्या बातम्या आता ग्रामीण भागातून येत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
भारत हा कृषीप्रधान देश असल्याचा गवगवा होतो मात्र या देशातील बळीराजा जे नवीन शोध, प्रयोग, व उपक्रम राबवतो हे या आधी म्हणावे तसे दाखवले गेले नाही, आता मात्र डिजिटल युगात माझा बळीराजा काय करतोय हे परदेशात देखील अगदी सचित्र बघता येते. ग्रामीण भागात असलेल्या हरहुन्नरी कलाकारांना आता स्थान मिळू लागले आहे, कला, क्रीडा, साहित्य, नवनवीन शोध आदी गोष्टीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
पहिले केवळ शहरी पत्रकारिता लक्ष असलेल्या प्रस्थापित माध्यमांनी देखील आता ग्रामीण भागातील घडणाऱ्या प्रत्येक बातमीवर करडी नजर ठेवायला सुरुवात केली अन त्यांना देखील टीआरपी मिळू लागला. अलीकडच्या काळात पत्रकारितेचे शिक्षण देणारे केंद्र सुरू झाल्याने पत्रकारिता आधिकच गतिमान झाली, यात शोध पत्रकारिता व नाविन्यपूर्ण वार्ता संकलन सुरू झाल्याने काही वेळातच मिलियन मध्ये विव्हर्स मिळायला लागले. ग्रामीण मधील अगदी छोट्या, साध्या घटना घडामोडीचा सर्व कंगोऱ्याचा अभ्यास आता होऊ लागला आहे. एकंदरीतच ग्रामीण पत्रकारिता आता व्यापक स्वरूप प्राप्त करत आहे.
संकलन
सौरभ लाखे