
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
‘10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना आणि प्रोत्साहन’ या योजनेमुळे छोट्या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक बदल घडून येतील – नरेंद्र सिंग तोमर
गोवा :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज 4 जानेवारीला गोव्यात, क्वीपेम येथील बोरीमोल क्रीडा संकुलात कृषी महोत्सव 2022 चे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली, केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी आणि संबंधित क्षेत्रांना सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. गोवा राज्य सरकारने सुरु केलेली ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही संकल्पना इतरांसाठी आदर्श आहे आणि यातून केवळ गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महामारीच्या काळात, गोव्यातील पर्यटन क्षेत्राची काहीशी पीछेहाट झाली असली तरीही या काळात येथील कृषी क्षेत्राने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी आखून दिलेल्या धोरणानुसार वाटचाल करत चांगली आघाडी घेतली असे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आणि छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना आणि प्रोत्साहन’ ही योजना सुरु केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. वर्ष 2027-28 पर्यंत अशा 10,000 संस्थांची स्थापना आणि प्रोत्साहन याकरिता 6,865 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे असे ते म्हणाले. गोवा राज्यात ह्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ही योजना छोट्या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरेल असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केली, या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केले जातात. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले की समाजातील प्रत्यक माणसापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य असून, राज्य सरकार त्याच दिशेने कार्य करत आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन पद्धती युवावर्गाला राज्यांतील कृषीक्षेत्राकडे आकर्षित करत आहेत असे सांगून, कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यशेती आणि फुलशेती या सर्वांच्या समावेशातून एकात्मिक पद्धतीची शेती करण्याचे आवाहन तोमर यांनी गोव्यातील शेतकऱ्यांना केले. संसद सदस्य विनय तेंडूलकर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.