
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे” लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यासाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो असे ठामपणे आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणतात. म्हणूनच त्यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यासाठीच हा लेखन प्रपंच……
जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना आपणास काही क्षणात समजतात त्यात नवीन शोध, राजकारण ,अर्थकारण ,सभा-संमेलने, कला ,क्रीडा, शिक्षण ,निवडणुका, चित्रपट प्रदर्शित होणे,खून ,फसवणूक दरोडे, किंवा समाजातील स्थित्यंतरे याबाबतची माहिती असो, आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार बंधु करतात, समाजासाठी सातत्यपूर्ण झगडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ,पत्रकार हे देशाचे खरे भक्त असतात याची जाणीव समाजाला करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
आपले राज्य का गेले?आणि इंग्रज भारतात का आले,? याचे अचूक निदान करणारे महाराष्ट्रातील पहिले विचारवंत ,आद्य इतिहासकार, संशोधक, श्रेष्ठ पत्रकार, म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना सर्वत्र ओळखले जाते, ते एका ठिकाणी म्हणतात, शिक्षकाने शंभर पट ज्ञान आत्मसात केले तर दहा पट ते आपल्या विद्यार्थ्यांला देऊ शकतात,यातून वाचनाचे महत्त्व विशद करतात, आजच्या काळात वाचन कमी केले जात आहे, म्हणून आपल्याला इतर देशांच्या इतिहासाची माहिती नाही, त्यासाठी वाचन आवश्यक आहे.
ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते, त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी स्त्री शिक्षण, पाश्चात्य शिक्षण, धर्म शिक्षण, इतिहास संशोधन, शिलालेखवाचन, ताम्रपट वाचन इत्यादीचे सखोल वाचन केल्या मुळे आज सर्वत्रच त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते, त्यांना आठ भाषा अवगत होत्या, बंगाली, तेलुगू, कानडी, फार्सी ,
अरबी, गुजराथी, फ्रेंच, व ग्रीक त्यामुळेच ब्रिटिशांच्या काळातील ते विद्वान समजले जात होते.
दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते, हिंदुस्तानातील पहिले प्रपाठक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला, १८३२ साली आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ नावाचे पाक्षिक काढून समाजातील वाईट ,रुढी परंपरा काढून टाकण्याचा प्रयत्न केला, आणि दर्पणमधूनच समाजसुधारणा, स्वदेशाभिमान लोकांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले,म्हणूनच, त्यांना ‘दर्पणकार ‘म्हणून ही ओळखले जाते वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यास वर्तमानपत्र महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल, व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचार मंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो, असे ठामपणे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सांगतात.
आज समाजामध्ये फूट पडत आहे, कोणी -कोणाचे ऐकून घेत नाहीत, मी मोठा आहे, माझा वंश मोठा आहे, म्हणून समाज दुभंगला जात आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी फक्त समाजाला उपदेश केला नाही, तर अनेक धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून स्वधर्मात घेतले, चांगल्या समाजरचनेच्या उभारणी साठी न्याय व विवेक यांच्या आधारे समाज रचना उभी झाली पाहिजे,असे ते सतत म्हणत असत, आजही पत्रकारांनी समाजातील वास्तव्य बाहेर आणावे गोरगरिबांना त्रास होणार नाही,गुलाम म्हणून वागणूक दिली जाणार नाही ,यांची दक्षता घ्यावी, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैर वापर होता कामा नये, डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळकांसारखी निर्भीड पत्रकारिता असावी, तरच गुन्हेगारी वर अंकुश बसेल, व गुन्हेगाराला शिक्षा होईल, नाही तर सर्वत्रच अंदाधुंदी माजेल, यात तिळमात्र शंका नाही, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी १) १)नीतिकथा, २) सारसंग्रह,३) भूगोलविद्या, ४) द हिस्ट्री ऑफ इंडिया ५) द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया इत्यादी ग्रंथाची निर्मिती करून ज्ञान भांडार उपलब्ध करून दिले.
आज आपण बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या लिखाणासारखे लेखन करू शकतो का? यांचाही विचार करणे आवश्यक आहे,त्यांनी भारतीय शिलालेख, ताम्रपट यांची सविस्तर माहिती ‘राॅयल एशियाटिक सोसायटीच्या’ त्रैमासिकातून लोकांपर्यंत वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली होती, म्हणूनच मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स कार्नेक यांनी १८४० मध्ये ‘जस्टीस ऑफ दि पीस’ पदवी देऊन यथोचित त्यांचा गौरव केला, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, व ज्ञानेश्वरीचा पहिला छापील ग्रंथ पाठभेदासह त्यांनी संपादित केले, म्हणूनच त्यांना ज्ञानप्रसाराचे ‘आद्य प्रवर्तक ‘म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्या कडे पाहतो.
आज आपण सर्वांनीच त्यांच्या सारखे निर्भीडपणे वागलो, अनेक ग्रंथ लिहिले, अनेक भाषा शिकल्या, तरच आपला देश महासत्ता होण्यासाठी काही ही वेळ लागणार नाही, आजच्या तरुणांनी कोणत्याही व्यसना कडे वळू नये, परिश्रम करून चांगले जीवन जगावे, दर्जेदार लेखन करावे, अंधश्रद्धेचे व अज्ञानाचे कीटाळ दुर करावे, पत्रकारांची नोकरी करतेवेळी सडेतोडपणा,धैर्य, स्वंतत्र लेखन करण्याची क्षमता, मार्मिकपणा, चौकसपणा, समजूतदारपणा
नि: पक्षपातीपणा असावा, समाजातील प्रमाणिक माणूस शोधून काढावा, अन्याय करणाऱ्या माणसाला शिक्षा द्यावी, हे पत्रकारितेतील महत्त्वाचे कार्य आहे,त्यांनी आपले कार्य वाणीतून न दाखविता कृतीतुन दाखवावे,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या
निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव,
अहमदनगर, मो, 9921208563