
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर :- बांबू लागवड या घटकाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी कृषि विभाग, लातूरतंर्गत मौजे सलगरा बु.येथे शंभर एकरावर बांबु लागवड करण्याच्या उद्देशाने दिनांक 8 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 10-00 वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस.गावसाने उपविभागीय कृषि अधिकारी आर. एस. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
तरी परिसरातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांनी केले. कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प ( पोकरा) लातूर जिल्ह्यातील 282 गावांमध्ये राबविला जात असून हवामान बदलामुळे उद्वलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे, जमिनीची धूप थांबविणे, जमीनीचा कस वाढविणे, शेती पिकाला पूरक म्हणून बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, शेती पध्दतीवर आधारित बांबू लागवड विस्तार व क्षमता बांधणीसाठी सहाय्य करणे या उद्देशाने वानिकी आधारित शेती पध्दती अतंर्गत बांबू लागवड या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात करण्यात आला आहे.
अर्थसहाय्य- बांबू लागवड या घटकातंर्गत देय अनुदान बाबनिहाय मंजूर मापदंडानुसार खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत – जास्त 72 हजार प्रती हेक्टरच्या मर्यादेत ( यापैकी जी रक्कम कमी असेल ती ) अर्थसहाय्य देय राहील, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.