
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा दि. 5 :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता कोरोना व ओमायक्रॉनविषयी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे सातही तालुक्यातील गावागावात चित्ररथाव्दारे प्रचार-प्रसिध्दी करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांच्याहस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विदर्भ सिंचन महामंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोना कमी झाला असे समजून मास्क न वापरण्याची सवय नागरिकांमध्ये वाढली आहे. हे घातक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी कोरोनाशी लढण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी या चित्ररथाव्दारे जागृती करण्यात यावी. भंडाऱ्याच्या स्थानिक भाषेतुन जनजागृती… अजी..तोंडाले मास्क लावा न जी… यासारख्या बोलीभाषेतुन या चित्ररथांव्दारे जागृती करण्यात येणार आहे. बोलीभाषेतुन सामान्य माणसांच्या अधिक जवळ जाता येत असल्याने हा प्रयोग पहिल्यादांच करण्यात येत आहे.