
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांत लसीकरण ही अत्याधिक महत्वाची बाब आहे. त्यामुळे ते पूर्ण होण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे,तसेच आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी बुधवारी अंजनगाव सुर्जी-दर्यापूर दौ-यादरम्यान निर्देश दिले. कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी अंजनगाव सुर्जी,दर्यापूर येथे भेट दिली,त्यावेळी त्या बोलत होत्या.उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार योगेश देशमुख,तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.अंजनगाव सुर्जी व दर्यापूर येथे आरोग्य यंत्रणेचा बैठकीद्वारे आढावा घेतानाच तेथील रूग्णालये,ऑक्सिजन प्लान्टची पाहणी त्यांनी केली,तसेच पांढरी येथील कोविड केअर सेंटरलाही भेट देऊन पाहणी केली.
वैद्यकीय अधिका-यांच्या नियमित बैठका घ्या
दुस-या मात्रेचे लसीकरण न केलेल्या पात्र व्यक्तींबाबत याद्या वैद्यकीय अधिका-यांकडे असणे अपेक्षित आहे.त्यानुसार पात्र व्यक्तींना प्रोत्साहित करून लसीकरण करून घ्यावे. वैद्यकीय अधिका-यांच्या तहसील स्तरावर नियमित बैठका घ्याव्यात.लसीकरणाचा वेग कमी होता कामा नये.वैद्यकीय अधिका-यांकडून कामात कुचराई होत असेल तर कारवाईचे प्रस्ताव द्यावेत,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. कोविड प्रतिबंधासाठी दर्यापूर येथील यंत्रणेचे नियोजन व कामकाज चांगले असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहाटे व रामतीर्थ येथे १०० टक्के लसीकरण झाल्याबद्दल डॉ. अर्चना गोळे यांचा गौरव जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला.
नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी
अंजनगाव सुर्जी तालुक्यात लोकजागर व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने नागरिकांचा सहभाग मिळवून नाला खोलीकरणाची कामे होत आहेत. त्याची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली.जलसंवर्धनासाठी हे महत्वाचे काम असून, अशी कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील. याबाबत जिल्हा स्तरावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल,असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.अंजनगाव सुर्जी येथे नाविण्यपूर्ण योजनेद्वारे निर्मित अभ्यासिकेलाही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.