
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती:- कोरोना साथ,ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरणात प्रशासनाने आघाडी घेतली आहे. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून नियमित आढावा घेतला जात असून,विद्यार्थ्यांच्या लसीकरणानेही वेग घेतला आहे. दरम्यान,कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विविध ठिकाणी पथकांकडून कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून लसीकरण वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका व ठिकठिकाणच्या केंद्रांना भेटी देऊन सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
कुमारवयीन विद्यार्थ्यांचेही लसीकरण वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार एसडीओ,तहसीलदार कार्यालयांकडूनही पाठपुरावा होऊन कामांना वेग आला आहे. अमरावतीत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले.अंजनगाव सुर्जी तालुक्यात तहसीलदार अभिजित जगताप यांनी कोरोना नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक घेऊन लसीकरण,मास्क वापर आदींबाबत जनजागृतीच्या सूचना दिल्या.
चिखलदऱ्यात शासकीय आश्रमशाळांत लसीकरण
चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची ऑनलाईन सभा घेऊन साथ नियंत्रणासाठी लसीकरण व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. चिखलदरा तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये शनिवार व रविवारी लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे श्रीमती माने यांनी सांगितले.
नियमभंग करणाऱ्यांवर बडगा
दरम्यान,कोविड प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विनामास्क फिरणाऱ्या ३६ व्यक्तींना आज दंड करण्यात आला.अधीक्षक उमेश खोडके यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. महापालिकेची पथकेही नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरसावली आहेत.नियमभंग करणाऱ्या आस्थापना व व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होत आहे.