
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी / बालाजी पाटील गायकवाड
मला कुणी विचारले की आजची सर्वात वाईट व क्रूर गोष्ट कोणती..? “महाराष्ट्रातील विनाअनुदान शाळेतील शिक्षकांची..?” मी क्षणात उत्तर देईल. मग ती सत्ता राबवणाऱ्यांना का वाटत नाही..? बांधकामातून निकामी झालेल्या दगडासारखे त्यांना हे शिक्षक वाटतात काय ? पंधरा, अठरा,वीस वर्षे उलटली अनेक एस.एस.सी एच. एस. सी च्या बॅचेस यांनी घडवल्या, खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले ते या शाळामुळेच ना.! इतकी वर्षे या शिक्षकांना रुपया पाहायला मिळाला नाही. विनामूल्य रक्त ओकताहेत पण याची लाज आहे का शासनाला.
याची म्हणजे या शिक्षकांची शोकांतिका किरण चव्हाण या भुदरगड तालुक्यातील शिक्षकाने ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ या पुस्तकातून मांडली आहे. या पुस्तकाला हेरंब कुलकर्णी या संवेदनशील लेखकाची प्रस्तावना आहे. ‘अश्रूंनी लिहिलेली वेदनेची बखर’ असे ते या पुस्तकाचे वर्णन करतात. हे पुस्तक वाचून कोणाच्या डोळ्यात पाणी (अश्रू) आले नाही तर त्याचे हृदय बिलकुल दगडाचे समजा असे. सत्ताधारी दगडांच्या राजवटी आल्या आणि गेल्या. मात्र त्यांना निदान मानवतेच्या भूमिकेतून सुद्धा बिलकुल दया आली नाही. आज आपण महिन्याला १०० कोटींच्या वसुलीच्या बातम्या वाचतो,मात्र १८ वर्षे बिनपगारी म्हणजे नेमके काय ?
या खोलात कोणी गेले नाही. पुस्तक केवळ भावनेने लिहिले नाही तर त्यात बुद्धीचाही मोठा वापर केला आहे. कसे जगले असतील हे शिक्षक ? कसे जगत आहेत हे शिक्षक ! यांचे तरुणपणीच कोचे गेलेले गाल,ऐन तारुण्यात म्हातारपणाच्या लकेरी, यांची पोकी पोकी झालेली शरीरं. या राज्यकर्त्यांना कशी दिसत नाहीत. उद्योगपतीना कर्जमाफीसाठी पैसे आहेत मात्र या सरकारला विनाअनुदानित शिक्षकांना पाच-दहा हजार पगार द्यायला पैसे नाहीत. संध्याकाळी कमिशनचा हप्ता आला नाही तर यांना झोप येत नाही. या शिक्षकांनी कशी काढली असेल वर्षामागून वर्षे.!!
पुस्तकात रचनेपासून तपशीलापर्यंत लेखकाची प्रतिभा जागोजाग दिसते. मुळात विनाअनुदानित धोरणाची वाटचाल कशी झाली याची लेखक मिमांसा करून शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सावंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रतिनिधी खंडेराव जगदाळे यांच्या मुलाखती घेतात. तर विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना यात सोळा वेदनांचे उमाळे आहेत. वैतागून हे शिक्षक इच्छामरणाची परवानगी मागतात. ‘स्वातंत्र्यदिनी एका शिक्षकाची आत्महत्या’ हे प्रकरण थेट काळजाला भिडतं. या सोळा प्रकरणात ज्या व्यथा-वेदनांची कथा आपण वाचतो. तेव्हा निर्दयी शासनाच्या अन्यायाबद्दल तोंडात शिव्या येतात. हे शिक्षक असा काय गुन्हा करतात की, त्यांच्या गळ्यात शासनाने नरवेदना बांधाव्यात, असा प्रश्न पडतो.
‘काळाने हिरावून घेतलेले विनाअनुदानित शिक्षक’ व ‘विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या’ या दोन प्रकरणात या तणावातून मृत्यू झालेल्या ४७ शिक्षकांची यादीचं लेखक देतात, गलबलून जाते. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेल्या हत्याच आहेत, तर कळतील का हो अंतरीच्या भावना?यात लेखकाने फोडलेला आर्त हंबरडा वाचून काळजाचे पाणी पाणी होते. बाप म्हणतो लेकाचा पगार सुरू करा, लहानगा लेक म्हणतोय, ‘बाबांचा पगार कधी सुरू होईल ?’ लेखक म्हणतो ‘आत्तापर्यंत आम्हाला सारे निर्दयी बाप भेटले तुम्ही आई व्हा ना !, आमच्यासाठी अनुदान द्या ना !’ केवळ आमच्या कुटुंबाची खळगी भरण्याइतके ! या आर्त हंबरड्यानी दगडालाही पाझर फुटतील असे ते.
महाराष्ट्रातील काही विचारवंतांचे याबाबत विचार एका प्रकरणात आहेत. डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणतात, ‘अनिष्ट विनाअनुदानचे हे अरिष्ट आहे’. तर श्री.संपत गायकवाड शासनाला या बाबत गंभीर विचार करायला सुचवतात. तर शांताराम गजे कायम विनाअनुदान म्हणजे मरेपर्यंत विनाअनुदान काय ?असा खोचक प्रश्न विचारतात.प्रा. किसनराव कुराडे म्हणतात की, विनाअनुदान शिक्षण पद्धती ही एक नादान बाब आहे. अनिल बोरणार म्हणतात की, प्रलंबित म्हणजे कुठंवर प्रलंबित ? पुस्तकात इतरही प्रकरणे आहेत.
एकूणच खरं तर एका अनुदान नसलेल्या प्रतिभावंत लेखकाने लिहिलेले हे पुस्तक आहे. उपाशी शिक्षकांचे उपाशी शिक्षकाने लिहिलेले हे पुस्तक आहे. असे म्हणतात की, कला-साहित्य याची निर्मिती भरल्या पोटातून होते. लेखक याला अपवाद ठरला आहे. शेवटी लेखक परिचयातील माहिती वाचून अचंबित व्हायला होते.जणू उकिरड्यावर पडलेलं रत्न. मी शेवटी अपेक्षा करतो की, शासनाने विनाविलंब या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे व पापाचे वाटेकरी होणे थांबवावे.
– शांताराम गजे
अकोले जि- अहमदनगर.
मोबा -९९७०७३०२५०.
—————————————————-
विनाअनुदानितची संघर्षगाथा.
पुस्तकासाठी संपर्क –
किरण चव्हाण. -८८०६७३७५२८.