
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- दिवंत स्वराज फाउंडेशन मार्फत उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा पंपाच्या साह्याने मोखाड्यातील मो-हांडा दिगी-दहाड येथील सुमारे ३२ शेतकऱ्यांनी रब्बी शेती करण्यास सुरुवात केली असून जवळपास ३५ एकर क्षेत्र हे ओलीताखाली येणार आहे. जव्हार, मोखाडा हे तालुके अतिवृष्टीचे असून सुद्धा बेसाल्ट खडकांमुळे पाणी जमिनीत मुरत नसून ते वेगाने वाहून नद्यांना मिळते. या तालुक्यात नद्या आणि शेती क्षेत्र यामध्ये कमालीचे अंतर असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यास आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने आणि म्हणूनच स्वराज्य फाउंडेशने सौरऊर्जेचा वापर करून सोलर पंप चालविण्याचा प्रयत्न केला.
या सोलर पंप प्रकल्पांमध्ये फाउंडेशनने सुरुवातीला नदीवर बंधारा बांधून त्या बंधाऱ्यात पाण्याचा साठा करण्यात आला असून पाच हॉर्सपॉवर सौर पंप बसविण्यात आलेला असून गावातील ३२ शेतकऱ्यांनी गट स्थापन करून सौर पंपाची मागणी केली होती.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी कांदा,वांगी,भुईमुंग, पालेभाज्या अशी रब्बी पिके तर आंबा,काजू सारख्या फळझाडांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी बंधारा, सौरपंप, शेती यांच्या व्यवस्थापनाकरिता शेतकरी गटांकडून दरमहा बँक खात्यात बचत जमा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.