
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
पंतप्रधानांनी स्टार्ट-अप इंडियाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज भारताला जगातील पहिल्या तीन स्टार्ट-अप राष्ट्रांमध्ये स्थान मिळाले आहे: अनुराग ठाकूर
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती असून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळला जातो. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नांमधील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंध प्रसिद्ध केले. दोन संकल्पनांवर 1 लाखाहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत.
आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी युवकांना संबोधित केल्याबद्दल, अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ठाकूर म्हणाले की स्वामी विवेकानंद हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत, ज्यांची जयंती 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा संदेश आणि दृष्टिकोन मांडणाऱ्या आणि जगामध्ये देशाची प्रतिमा मजबूत करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपला देश पुढे जात असतानाच, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशाला नवी दिशा देण्यासाठी युवकही पूर्णपणे सज्ज झाले आहेत. ठाकूर म्हणाले की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी दिलेले बलिदान आपण विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात पोहोचेपर्यंत देश नवीन शिखरे गाठेल हे सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आता कठोर परिश्रम केले पाहिजेत.