
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
फिरत्या चित्ररथाच्या माध्यमातून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो पोहचत आहेत लोकांपर्यंत
पुणे :- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे या कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त जनजागृती कार्यक्रम आज उत्साहात सुरू करण्यात आला. संसर्गजन्य साथीच्या काळात फिरत्या चित्ररथावर लावलेल्या बनर्स व ध्वनीफितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न हा विभाग करत आहे. स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यासाठी विभागातील कलाकारांनी ‘सक्षम युवा, सशक्त युवा’ या संकल्पनेवर गाण्याची निर्मिती केली असून, त्या माध्यमातून युवाना प्रेरित केले जाणार आहे. यावेळी महापौर, जिल्हाधिकारी अशा मान्यवरांनी चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाला सुरुवात करून दिली. यासह नागपूरमध्ये रक्तदान शिबिर व सेमिनार, नाशिकमध्ये ऑनलाइन वक्तृत्व तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धा तर, जळगाव येथे योग वर्गाचे आयोजन करण्यात आले.
पुददूचेरी येथे 12 ते 16 जानेवारी 2022 या काळात होणाऱ्या 25व्या युवा महोत्सवाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या पाच दिवसांच्या कालावधीत होत असलेल्या आभासी राष्ट्रीय युवा महोत्सवाअंतर्गत देशासाठी बलीदान देणा-या वीर महापुरूषांची माहिती देणे, युवकांच्या मनात महापुरूषांची प्रेरणा रूजविणे, सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणे, जगात भारताचे नाव पुढे नेण्यासाठी नवयुवकांद्वारे करण्यात येणारे विविध प्रयोग, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रेरीत करण्याकरीता जनजागृती निर्माण केली जात आहे. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नांदेड, चंद्रपूर अशा दहा जिल्ह्यांमध्ये ही प्रचार-प्रसार मोहिम पुढचे काही दिवस राबविण्यात येणार आहे.