
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी/माधव गोटमवाड
भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला गोड सुरुवात करायचा सण म्हणजे मकर संक्रांत होय, त्यासाठीच हा लेखन प्रपंच…….. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येणारा एक शेतीशी संबंधित असणारा महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सत्तर टक्के लोक शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. या काळात शेतीमध्ये गव्हाच्या ओंब्या, करडई ,हरभरा, ऊस, बोरे ,बिब्बे असतात. असे सर्व पदार्थ एकत्रित करून सुगडीत भरून देवाला अर्पण करतात.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत, तिसरा दिवस किंक्रांत, असा असतो. भोगीला अनेक प्रकारच्या फळभाज्या एकत्रित करून त्यांचे सेवन केले जाते. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी ,पापड, वांग्याचे भरीत, चटणी, आणि खमंग खिचडी ,हरभऱ्याची हिरवेगार दाणे, लालचुटूक गाजरे ,सर्व प्रकारच्या शेंगा एकत्रित करून भोगीची भाजी तयार केली जाते.संक्रांतच्या दिवशी सर्व नातेवाईकांना, मित्रांना ,लहान मुलांना तीळापासून बनविलेले अनेक पदार्थ देऊन” तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हटले जाते ,या मधून सुसंवाद साधला जातो आणि ऐक्य निर्माण केले जाते.
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात .किंक्रांत नावाचा भलामोठा एक राक्षस होता त्यांनी जनतेला खूप त्रास दिला होता,म्हणून त्याच दिवशी त्या राक्षसाला ठार करण्यात आले.त्यामुळे सर्व प्रजा सुखी झाली.म्हणून हा दिवस पाळला जातो .या दिवशी शुभ कार्य केले जात नाही. महाभारतामध्ये अशी एक कथा आहे की पितामह भीष्मांनी त्यादिवशी प्राणत्याग केला तो दिवस म्हणजेच उत्तरायण होय .म्हणून उत्तरायणाला शुभ मानतात व उत्तर दिशेला ही शुभ मानले जाते. संक्रांत दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशा ही कथा सांगितल्या जातात. या दिवशी लहान मुलांची ही बोरन्हाण केले जाते, पाच वर्षापर्यंतच्या मुलांना बोरन्हाण घातले जाते. एकमेव हा सण असा आहे की तो सूर्याच्या स्थानानुसार येतो.
बाकीचे सण चंद्राच्या स्थानानुसार येतात या अगोदर हा सण 2016 मध्ये 15 जानेवारीला आला होता. जास्तीत जास्त वेळा मकर संक्रांत हा सण 14 जानेवारीलाच येतो. इंग्रजी महिन्याची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो मकर संक्रांत या सणास अध्यात्मिक तसेच शास्त्रीय महत्त्व आहे या सणात तिळाला फारच महत्व आहे. कारण पूर्वी फारच थंडी पडत असे त्यामुळे उष्णता वर्धक म्हणून तीळ खाण्याची पद्धत सुरू झाली यातूनच तिळाचे लाडू बनविण्याची पद्धत सुरू झाली. या दिवसापासूनच हळदीकुंकवाचे कार्यक्रम ही महिला मोठ्या प्रमाणात साजरे करण्यासाठी एकत्रित येतात, त्यामुळे एकमेकींना सुसंवाद साधला जातो. आपण सर्व एक आहोत,यांची जाणीव होते,मनातील भेदभाव, कटुता, वैर, अहंकार ,गरीब- श्रीमंत, उच्च-नीचता नाहीसा होते, म्हणूनच हा उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो म्हणून सुसंवाद आणि ऐक्याचे प्रतीक संक्रांत म्हटले तर काहीही वावगे नाही,पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून याच दिवशी प्रार्थना करतात,असेही रूढी व परंपरा आहे. असे मला वाटते, या सणाच्या दिवशी पतंग उडवून आनंद द्विगुणित करण्याचा हा उत्सव आहे .
भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणून या दिवशी तपश्चर्या, ध्यान ,जप ,आणि धार्मिक क्रिया केल्या जातात या दिवसापासून हवामानात बदल होतो ,तो पिकासाठी अतिशय फायदेशीर असतो .
भारतातील वेगवेगळ्या राज्यात या उत्सवाचे पदार्थ वेगवेगळे करून सेवन केले जातात. सर्वात जास्त तीळ आणि गुळाचेच महत्त्व आहे .या दिवशी सकाळी लवकर उठून तीळाने स्नान करतात. हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये या सणाला खिचडीचा सण म्हणतात . पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी गंगासागर याठिकाणी खूप मोठा मेळा भरविला जातो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा करतात. आंध्रप्रदेशमध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो .
गुजरात मध्ये उत्तरायण नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी पतंग उडविण्याची स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून या सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ओरिसा राज्यात आदिवासी आपले नवीन वर्ष म्हणून मकर संक्रांत पासून सुरू करतात. आसाम मध्ये ‘बिहू ‘नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते. अशा प्रकारे हा सण सुसंवाद व ऐक्याचे प्रतीक म्हणून भारतात सर्व राज्यात फारच आनंदाने साजरा केला जातो .तसेच आबालवृद्ध पतंग उडवून जीवनाचा आनंद लूटतात. असे सण सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांशी सुसंवाद साधून साजरे करावेत .
मनात असणाऱ्या कटुता दूर कराव्यात. व सर्वाशी सौहार्दाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध टिकून ठेवून संस्कृतीचे रक्षण करावे.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत. मुखेड