
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे म्हणून २७ जुलै १९७८ ते १४जानेवारी १९९४ पर्यंत १७ वर्ष परिवर्तनवादी रणसंग्राम झाला. त्या रणसंग्रामात अनेक आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांना शहीद व्हावे लागले. विद्यापीठ नामांतराचा लढा हा तसा एका विद्यापीठाचे नाव बदलणे पुरता सीमित नव्हता . नावाची एक पाटी काढायची आणि दुसरी लावायची इतकाही तो सवंग नव्हता . तर या लढ्यात परिवर्तनवादी विचाराची मूल्य दडली होती .सवर्ण मानसिकता बदलण्याचा हा लढा होता . म्हणूनच तो सर्वार्थाने सामाजिक समतेचा ही विषय होता .अशा या परिवर्तनवादी लढ्यात अनेकांना तुरुंगवास झाला, कित्येकांच्या घराची राखरांगोळी झाली.
अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाली तर कित्येक जण या नामांतर लढ्यात शहीद झाले .२३ ऑगस्ट १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मराठवाडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रारंभी विद्यापीठाचा कारभार औरंगाबाद मधील सध्याच्या जिल्हा परिषद कार्यालयात होता. तत्पूर्वी १९५७ मध्ये न्यायमूर्ती एस. एम पळणिटकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ स्थापनेबाबत समितीची स्थापना करण्यात आली होती .या समितीने अनेक प्रश्न सोबतच विद्यापीठ कोठे असले पाहिजे , विद्यापीठाचे नाव काय असले पाहिजे, याचा विचार केला , त्यात अनेक नावा सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे आले होते .याचा उल्लेख करणे आवश्यक वाटते .
नामांतर चळवळीत जे उल्लेखनीय असे सत्याग्रह ,मोर्चे ,आंदोलन झाले त्यातील एक म्हणजे मुंबईचा दलित पॅथर नामांतर वादी संघटनांनी केलेला सत्याग्रह या सत्याग्रहात हजारो नामांतर वादी यांनी आपला सहभाग नोंदविला होता . सत्याग्रहींना ठेवण्यासाठी मुंबईचे ही तुरुंग अपुरे पडले तेव्हा अनेकांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले. रतनकुमार पटांगडे, गोपीनाथ मुंडे , कॉम्रेड मनोहर टाकसाळ, अँड भाई शरद गव्हाणे, साथी सुभाष लोमटे ,ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, यशपाल सरवदे, रमेश भाई खटांगळे, रंगा राचुरे, जनार्दन तुपे, किशोर साळवे आदी हजारो कार्यकर्ते येरवडा जेलमध्ये होते.
दरम्यान रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी काढलेल्या लॉंग मार्च च्या अगोदर औरंगाबादेत निघालेल्या मोर्चात प्राचार्य म. भी.चिटणीस यांच्यासह कितीतरी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईस एक विराट मोर्चा काढला होता. माईसाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन तुरुंगवास भोगला. मराठवाड्यातही अन्यत्र मोर्चे निघत होते. सत्याग्रह होते होते. त्या सर्व मोर्चे सत्याग्रह निदर्शनात नात त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी व महिला पुरुष वृद्ध तरुणांनी आपला सहभाग नोंदविला होता हे विशेष ! विद्यापीठ नामांतराचे यश हे जनआंदोलनाच्या रेट्यामुळेच मिळाले,हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे .
नामांतराचा लढा हा तसा भावनिक होता त्यात आंबेडकर वाद्यांचा जीवन-मरणाचा कुठलाही आर्थिक प्रश्न गुतलेला नव्हता. हे जरी खरे असले तरी नामांतर हा दलितांच्या सामाजिक अस्तित्वाचा तसाच सामाजिक परिवर्तनाचा लढा होता. म्हणून या लढाईतून माघार घेणे परिवर्तनवादी चळवळीला शक्यच नव्हते. विद्यापीठ नामांतराचा लढा जिंकला पण पुढे काय ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे जागतिकीकरण, खाजगीकरण, आरक्षण, राखीव जागा, शिक्षण शेती ,आरोग्य , पदोन्नती, वाढती महागाई या स्पर्धेत जो टिकेल त्याने जगावे, न टिकणाऱ्या ने मरावे, अशी परिस्थिती आज पाहावयास मिळते तात्पर्य आंबेडकरी चळवळीने खाजगीकरना विरुद्ध आणि संविधान विरोधी शक्ती विरुद्ध प्रखर लढा दिला पाहिजे. असे म्हटले तर ते गैर ठरू नये .
नामांतराचा इतिहास – नामांतराची चळवळ इतकी विशाल, व्यापक आहे की, या समग्र चळवळीवर जेवढे – लेखन संशोधन होईल, तेवढे ते भावी पिढीसाठी व अभ्यासकासाठी मोलाचे उपयुक्त प्रेरणादायी ठरणारे आहे . जातीवादी जुलुमानच्या काळरात्री ज्या परिवर्तन वाद्यांनी महात्मा फुले , डॉ .बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी विचाराच्या, सामाजिक न्यायाच्या समतावादी विचारांचा झेंडा हाती घेऊन देदिप्यमान नामांतर लढा लढविला त्या परिवर्तनवादी चळवळीस व नामांतर लढ्यात शहीद झालेल्या पोचीराम कांबळे,जनार्दन मावडे, गोविंद भुरेवार, दिलीप रामटेके, चंदर कांबळे,नारायण गायकवाड , शरद पाटोळे, रोशन बोरकर , कुमारी सुहासिनी बनसोडे , कुमारी प्रतिभा तायडे , अविनाश डोंगरे कवी विलास घोगरे , आणि दलित पॅथर चे गौतम वाघमारे यासारख्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आपल्या जीवाची बलिदान दिले.
अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना समाजातील सर्व पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नामविस्ताराचा सर्वमान्य ठराव मांडून संमत करून घेतला , ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक ऐतिहासिक घटना आहे. आज आपल्या विद्यापीठाच्या नाम विस्तार झाला आहे. त्यानिमित्ताने मी ज्या ज्या व्यक्तींनी नामांतराच्या क्रांतिकारी लढ्यात त्याग ,बलिदान दिले त्यांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे .मी त्या सर्व शहिदांच्या व त्यागी हुतात्म्यांच्या स्मृतीस नामांतर दिनानिमित्त विनम्रपणे अभिवादन करतो.