
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. नांदेड जिल्ह्यात यावर्षी थंडी प्रमाण निश्चितच लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणावरचा पाऊस, त्याचबरोबर इतरत्रचा वातावरणातील बदलसुध्दा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे थंडीची लाट कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः दोन दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही. दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम हवेत कमालीचा गारवा आहे. थंड वारे आणि या गारव्यामुळेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणातील मोठ्या प्रमाणावरच्या या बदलाने व्हायरल इन्फेक्शनसुध्दा होत आहे.
गारव्याने, थंड हवेने सर्वदूर सर्दी, खोकला, अंगदुखी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येवू लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तक्रारींमुळे नागरीक कमालीचे अस्वस्थ आहेत. भितीपोटीच काहींनी रुग्णालयाकडे जावयास सर्रास टाळाटाळ सुरु केली आहे. तर काहींनी कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रकारच्या चाचण्यासुध्दा करावयास सुरुवात केली आहे. वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत करणारे, ठप्प करणारे ठरत आहे. सकाळी सर्वदूर धुके पसरत आहेत. त्यामुळे सकाळचे दैनंदिन व्यवहार कमालीचे मंदावले आहेत.