
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- खादी कापडापासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज शनिवारी “सैन्य दिन” साजरा करण्यासाठी जैसलमेर मधील भारत-पाकिस्तान सीमेवर भव्य सार्वजनिक प्रदर्शनासाठी फडकवला जाईल. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचा केंद्रबिंदू असलेल्या लोंगेवाला येथे हा राष्ट्रीय ध्वज फडकवला जाईल.
2 ऑक्टोबर 2021 रोजी लेहमध्ये अनावरण केल्यापासून या राष्ट्रीय ध्वजाचे हे 5 वे सार्वजनिक प्रदर्शन असेल. 8 ऑक्टोबर 2021 रोजी हवाई दल दिनानिमित्त हिंडन हवाई तळावर आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात 100 कोटी कोविड लसीकरण पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर हा ध्वज फडकवण्यात आला होता. 4 डिसेंबर 2021 रोजी, नौदल दिन साजरा करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नौदल गोदी येथे हा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.
भारतीयत्वाच्या सामूहिक भावनेचे आणि खादीच्या कारागिरीचे प्रतीक असलेल्या या राष्ट्रीय ध्वजाची संकल्पना स्वातंत्र्याची 75 वर्षे , ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’, साजरा करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) तयार केली आहे.. ऐतिहासिक प्रसंगी प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा ध्वज संरक्षण दलांकडे सुपूर्द केला आहे.
हा राष्ट्रीय ध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद असून वजन (अंदाजे) 1400 किलोग्रॅम आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागिरांना 49 दिवस लागले. या राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीमुळे खादी कारागीर आणि संबंधित कामगारांसाठी सुमारे 3500 मनुष्य तास अतिरिक्त रोजगाराची निर्मिती झाली .एकूण 33, 750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला ध्वज तयार करण्यासाठी हाताने कातलेल्या, हाताने विणलेल्या तब्बल 4500 मीटर खादी कापडाचा वापर करण्यात आला आहे. ध्वजातील अशोक चक्र 30 फूट व्यासाचे आहे.”