
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रियर अॅडमिरल केपी अरविंदन यांनी 14 जानेवारी 2022 रोजी झालेल्या भव्य समारंभात विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रियर अॅडमिरल बी. शिवकुमार यांच्याकडून मुंबईच्या नौदल गोदीचे अॅडमिरल सुपरिटेंडंट म्हणून पदभार स्वीकारला. रियर अॅडमिरल केपी अरविंदन हे लोणावळ्याच्या आयएनएसशिवाजी नौदल अभियांत्रिकी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून ते या विद्यापीठाच्या नौदल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी आहेत आणि ते 1987 साली भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाले. अॅडमिरल केपी अरविंदन यांनी सागरी अभियांत्रिकी शाखेतील बी.टेक. पदवी घेतली असून मुंबईच्या एनआयटीटीआयई संस्थेतून औद्योगिक अभियांत्रिकी विषयात एम.टेक. केले आहे.
नौदलातील 34 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कमांड मुख्यालय, प्रशिक्षण आस्थापना, सागरी गॅस टर्बाईन ओव्हरहॉल केंद्र, आयएनएस एक्सिला आणि मुंबई येथील नौदल गोदीमध्ये विविध पदांवर काम केले आहे. पेट्या वर्गातील गस्त जहाज, किर्पाण हे क्षेपणास्त्रसज्ज संरक्षक जहाज आणि राजपूत तसेच रणजीत या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशक जहाजांवर देखील त्यांनी काम केले आहे. नजीकच्या भूतकाळात त्यांची आयएनएस शिवाजी या प्रमुख प्रशिक्षण आस्थापनेचे कमांडिंग अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती तसेच चार वर्षांच्या कालावधीसाठी त्यांनी कोमोडोर (ताफा देखभाल) म्हणून काम करताना विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची तसेच भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांच्या ताफ्याची देखभाल आणि दुरुस्ती यामधील समस्यांची सोडवणूक करण्यास मदत करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
फ्लॅग श्रेणीत बढती मिळाल्यानंतर, रियर अॅडमिरल केपी अरविंदन यांची कारवारच्या नौदल जहाज दुरुस्ती गोदीमध्ये अॅडमिरल सुपरिटेंडंट म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याआधी ते पश्चिमी नेव्हल कमांडच्या मुख्यालयात चीफ स्टाफ ऑफिसर (टेक्निकल) या पदावर कार्यरत होते.