
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
ई- संजीवनी म्हणजे देशाच्या आरोग्य क्षेत्रात घडलेली क्रांती- आरोग्यमंत्री
नवी दिल्ली :- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज दिल्लीत सीजीएचएस मुख्यालयात ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन सुविधा केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या केंद्रात सुरु असलेल्या टेलि कन्सल्टेशन सत्रांमध्ये डॉक्टरांकडून दिले जात असलेले मार्गदर्शन प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिले. या महामारीच्या काळात डॉक्टरकडे प्रत्यक्ष जाणे नेहमीच शक्य होत नाही ही बाब लक्षात घेत त्यांनी सांगितले की कोविड महामारीसारख्या परिस्थितीमध्ये टेलि कन्सल्टेशन, प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. टेलि कन्सल्टेशनच्या डिजिटल मंचाद्वारे पुरवल्या जाणाऱ्य आरोग्य सेवांची प्रशंसा करताना ते म्हणाले की ई-संजिवनी म्हणजे देशाच्या आरोग्य क्षेत्रात झालेली क्रांती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या परवडण्याजोग्या आणि सहजतेने उपलब्ध होऊ शकणाऱ्या आरोग्य सेवा पुरवण्याचे काम ही सेवा करत आहे. काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी टेलि- मेडिसीन सुविधा गरजूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतील ही बाब अधोरेखित केली होती, याचा मांडविय यांनी पुनरुच्चार केला. या मंचामुळे देशातील द्वितीयक आणि तृतीयक पातळीवरील रुग्णालयांवरील ताण कमी करण्याबरोबरच तळागाळामध्ये डॉक्टर आणि विशेषज्ञांच्या कमतरतेच्या समस्येचे देखील निराकरण होत आहे, असे डॉ. मांडविया म्हणाले. शहरी आणि ग्रामीण भारतामध्ये आरोग्य सेवांमध्ये असलेली तफावत कमी करण्याचे देखील काम ही सेवा करत आहे, असे त्यांनी सांगितले.
हब- स्पोक मॉडेलच्या माध्यमातून डॉक्टरांनी संबंधित विषयातील तज्ञ आणि विशेषज्ञांशी सल्लामसलत करावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सुचवले. ई-संजीवनी एबी- एचडब्लूसी अंतर्गत 1.60 कोटी वैद्यकीय मार्गदर्शन सत्रे झाली आहेत. ई-संजीवनीच्या माध्यमातून दररोज 1,10,000 रुग्णांना सेवा पुरवली जात आहे आणि एक समांतर आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. यापैकी 53% सल्ल्यांचा लाभ महिलांनी घेतला आहे.