
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- आजची संक्रांत ही काही निराळी नाही; दर वर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्या वेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्या वेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये ‘क्रांती’ काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी.’संज्ञा’ म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हांला चांगलं ज्ञान झालं पाहिजे.
संक्रांतीच्या दिवशी ‘तिळगूळ घ्या’ याचा अर्थ तिळा-तिळाने माणूस जमवा. माझं हृदय दुसर्यासाठी तीळतीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा आणि मी डंख कसा मारतो… विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा? एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही याच्यात. ते प्रतीक आहे. गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा.
प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? ‘संक्रांत’ याचा अर्थ ‘सम+क्रांत’ असासुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते. एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा- “दुर्दम्य होतील आशा आकांक्षा, होतील संग्राम गीते पुरी। देशार्थ होतील त्यागी विरागी, होईल संक्रांत तेव्हा खरी।” नुसत्या तिळगुळाने, हलव्याने होणार नाही. ‘स्वत:च्या मनाला हलवा’, असं ज्या वेळी मी स्वत:ला सांगेन, त्या वेळी यातून काहीतरी निर्माण होईल.
जर तुम्हांला स्वत:च्या उत्तम गुणांनी समाधान पावायचं असेल, तर ‘दुसरा’ हा तुमचा measurment आहे. दुसर्याला विचारा, ‘तुला माझ्याबद्दल काय वाटतं?’ पूर्वीचे राजे वेष बदलून आपल्या राज्यात हिंडत, आपल्याबद्दल लोक काय बोलतात? आणि मग दुसर्या दिवशी त्याचा सूड घेत नसत, तर ते स्वत:चे दोष सुधारत असत. असे दोष सुधारणारे होते, ते भोजराजे झाले. माझे दोष मी गुप्त रूपाने ऐकेन आणि मला सुधारेन, हे ठीक.
पण ‘दुसरा काय माझ्याबद्दल बोलतो’ हे पाहून डोकं फोडीन त्याचं दुसर्या दिवशी, असे अहंकाराचे शस्त्र परजतं जर आमचं आयुष्य झालं, तर संक्रांतीचे काटे उरतात, साखर चवीपुरता उरते, संक्रांतही संपते, राष्ट्रही संपतं. ते संपायचं नसेल, तर आपण नवी प्रतिज्ञा घ्या – “हे सत्यस्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून, सोप्या आणि खोट्या तर्हेने, सुटून जाण्याचा, कोणताही मार्ग नाही. शांतपणाने, स्वत: आत्मपरीक्षा करत, दुसर्याचे चांगले गुण ओळखत, स्वत:चे वाईट दोष सुधारत, माझ्यासाठी आणि समाजासाठी चांगली क्रांती माझ्या हातून घडावी, हीच संक्रांतीच्या प्रतीकाला मन:पूर्वक प्रार्थना!”