
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
‘लोकसहभाग’ या भावनेसह जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार, आणि केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्यासह कोविड-19 प्रतिबंधक लसीवरील विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन केले.
यावेळी बोलताना मंत्री डॉ.मनसुख मांडविया म्हणाले की, “16 जानेवारी 2021 रोजी भारतात सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले जात आहे, हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे.एका वर्षाच्या कालावधीत, आपण कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 156 कोटींहून अधिक मात्रा दिल्या आहेत.आपला लसीकरण कार्यक्रम खरे तर जागतिक समुदायासाठी एक आदर्श असून लोकसहभागामुळेच भारत हा पराक्रम करू शकला.”
“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली भारत सरकारने कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, असे डॉ.भारती प्रवीण पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्वदेशी लस विकसित करणे हे एक मोठे आव्हान होते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह चौहान म्हणाले,“कोवॅक्सीनवर टपाल तिकिटे जारी करण्याच्या उपक्रमासाठी टपाल विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.”या कार्यक्रमाला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, टपाल विभागाचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार पोद्दार,भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.