
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कृषी विभाग व पशू संवर्धन विभाग यांच्यावतीने उत्कृष्ट गोशाळा पुरस्कार देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथील राधेगोपाल गोवर्धन व गोसेवा प्रकल्पास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
राधेय सामाजिक संस्था अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथे राधेगोपाल गोवर्धन व गोसेवा प्रकल्प चालवले जाते.
देशी गाय जगेल तर शेती जगेल, हे उद्देश घेऊन चालणाऱ्या प्रकल्पास यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, डॉ. अंजलीताई आंबेडकर, आदींनी भेटी दिल्या आहेत. या प्रकल्पाचे संचालक तथा काठेवाडी गावचे सरपंच सुर्यकांत पोतुलवार यांनी मुक्त गोठा, शुध्द सकस आहार, बायोगॅस, सेंद्रिय शेती, गांडूळ खत आणि गोपालन असे वेगवेगळे प्रयोग केले आहे.
त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल राधेगोपाल गोवर्धन व गोसेवा प्रकल्प, काठेवाडी यांना जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत, पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागातर्फे सन्मानपत्र, रोख एक लाख रुपयाचा उत्कृष्ट गोशाळा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी राधेगोपाल गोवर्धन व गोसेवा प्रकल्पाचे संचालक तथा काठेवाडी गावचे सरपंच सुर्यकांत पोतुलवार, पीपल्स कॉलेज नांदेडचे प्रा. डॉ. बालाजी पोतुलवार, वन परिक्षेत्र अधिकारी तथा नांदेड जिल्हा फिरते पथक प्रमुख वन विभाग नांदेड चंद्रकांत पोतुलवार, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार कल्याणकर, जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बालाजी पाटील रावणगावकर, समाजकल्याण सभापती अॅड रामराव नाईक, शिक्षण विभागाचे सभापती बसवराज पाटील वन्नाळीकर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.