
दैनिक चालु वार्ता
दौंड प्रतिनिधी
अरुण भोई
दौंड :- पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु, ही योजना सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित आहे. सरकारची उदासीनपणा व नियोजनाच्या अभावी योजना कुचकामी ठरत आहे. दौंड तालुक्यातील जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या अडचणींबाबत आमदार राहुल कुल यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री. हनुमंत गुणाले यांचे कार्यालयात पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. प्रविण कोल्हे, श्री. संजीव चोपडे, समाविष्ट गावातील शेतकरी बंधू यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली.
सदर बैठकीमध्ये पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजनेतील अडचणी दूर करून या उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली, बैठकीतील काही प्रमुख मागण्या दौंड तालुक्यातील खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी या गावांचा समावेश जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेत करण्यात आला असून त्यामधील काही समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावाचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे.
तलावाचे फेर सर्वेक्षण करीत असताना येणाऱ्या सर्व अडचणी समजून घेऊन तलाव भरणेसाठी करण्यात येणाऱ्या उपयोजना करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात यावेत व प्रस्ताव तयार झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी दौंड आमदार राहुल कुल यांनी केली.