
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- ओसरविरा प्रमाणेच वाशाळा येथे पर्यटन विकासाच्या नावे अजूनपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी अजूनपर्यंत खर्च झाला असताना हा परिसर सुशोभीकरणा पासून उपेक्षित राहिला आहे. ग्रामीण भागात सूर्यमाला, जव्हार आदी ठिकाणी पर्यटन विकासाच्या नवा खाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून जिल्हा प्रशासन त्याकडे सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहे. वाशाळा या जिल्ह्यातील लेणीच्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सम 2018-19 च्या अर्थसंकल्पातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी जवळपास संपूर्ण निधी वितरित करण्यात आला आहे.
यामध्ये घाट बांधणे, सुशोभिकरण करणे, पदपथ बांधणे, पेवर ब्लॉक बसवणे तसेच शौचालय बांधणे, पाणीपुरवठा, पथदिवे, सौर ऊर्जा, अंतर्गत रस्ते उभारण्यासाठी, गटार, संरक्षण भिंत, भौतिक सुविधा, रेलींग- सभामंडप उभाण्यासाठी प्रयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लेणीच्या ठिकाणी आवश्यक सुशोभीकरण किंवा अपेक्षित पायाभूत सुविधांचा स्तर अजूनही उंचविण्यात नसून शौचालय पथदिवे तसेच प्रशासकीय मान्यता नमूद केलेल्या अनेक सोयी-सुविधा अजूनही अस्तित्वात नसल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे. जव्हार साठी आणखी 20 कोटींचा निशी?
जव्हार तालुका व परिसरात पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी व ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात दिवसभर ठाण मांडून बसले होते. जव्हार तालुक्यासाठी पर्यटन विकासाच्या नावाखाली 20 कोटी रुपयांचा निधीला 17 जानेवारी रोजी होणाऱ्या नियोजन समिती बैठकीत मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते. अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने पर्यटन विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात निधी उधळला जात असल्याचे आरोप होत आहेत.