
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पार्ल :- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (१९ जानेवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली. या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे होणार आहे. भारताकडून वेंकटेश अय्यरचे पदार्पण केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात अष्टपैलू वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी अय्यर वनडे पदार्पण करेल. तो भारताकडून वनडे खेळणारा २४२ वा खेळाडू ठरलाय.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळी दोन्ही संघांचे अंतिम ११ जणांचे संघही जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्त्व केएल राहुल करत असल्याने तो भारताचा २६ वा वनडे कर्णधार ठरला आहे. तसेच ११ जणांच्या भारतीय संघात शिखर धवन, आर अश्विन, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर यांचेही पुनरागमन झाले आहे. अश्विन जवळपास ४ वर्षांनी वनडे सामना खेळताना दिसणार आहे.
डीकॉकचे पुनरागमन भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू असताना अचानक कसोटीतून निवृत्ती घेणाऱ्या क्विंटॉन डीकॉकचे दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो बुधवारी वनडे सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने कागिसो रबाडा ऐवजी ११ जणांच्या संघात मार्को यान्सिनला संधी दिली आहे. रबाडाला वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडेसाठी ताब्राईज शम्सी आणि केशव महाराज या २ फिरकीपटूंना अंतिम ११ जणांमध्ये संधी दिली आहे.
असा आहे आमने-सामने इतिहास:- भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत ८४ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३५ सामन्यात भारताने विजय मिळवला असून ४६ सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच यातील ३४ सामने दक्षिण आफ्रिकेत झाले असून भारताने १० सामने जिंकले आहेत आणि २२ सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जानेमन मालन, एडेन मार्करम, रॅसी वॅन डर ड्युसेन, तेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिल फेहलुक्वायो, मार्को यान्सिन, केशव महाराज, तब्राईझ शम्सी, लुंगी एन्गिडी