
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पणजी :- एरिडाई सुआरेझ आणि झेव्हियर हर्नांडेझ यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर ओदिशा एफसीनं आजा इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) नॉर्थ ईस्ट युनायटेडवर २-० असा विजय मिळवला.दोघांनीही नॉर्थ ईस्टच्या बचावफळीला तालावर नाचवले. डॅनिएल लाल्हलिम्पईया (१७ मि.) व सुआरेझ (२२ मि.) यांनी पहिल्या हाफमध्ये मिळवून दिलेली आघाडी ओदिशानं कायम राखली. नॉर्थ ईस्ट युनायटेडला या सामन्यात नशिबाची साथ मिळाली नाही आणि त्यांचे दोन प्रयत्न गोलखांब्याला लागून परतले. अन्यथा या सामन्याचा निकाल बरोबरीत लागला असता. या विजयासह ओदिशानं पाचव्या स्थानी झेप घेतली.
दोन्ही संघ चेंडूवर ताबा मिळवून गोल करण्याच्या प्रयत्न शोधताना दिसले. १६व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टचे खेळाडू चेंडू पेलन्टी बॉक्समध्ये घेऊन गेले होते, परंतु सुहैर वडक्केपीडिकाला अंतिम स्वरूप देता आले नाही. त्यामुळे प्रशिक्षक खालिद जमील नाराज झालेले पाहायला मिळाले. पुढच्याच मिनिटाला ओदिशानं जोरदार धक्का दिला. एरिडाई सुआरेझनं नॉर्थ ईस्टच्या खेळाडूंना चकवले. उजव्या बाजूनं तो चेंडू अगदी शिताफीनं पेलन्टी बॉक्समध्ये घेऊन गेला. नॉर्थ ईस्टचे बचावपटू मॅन टू मॅन मार्किंग करण्यात चुकले अन् एरिडाईनं चेंडू गोलपोस्ट समोर उभ्या असलेल्या डॅनिएल लाल्हलिम्पईयानं सहजतेनं चेंडू गोलजाळीत पाठवला. पाच मिनिटांनी एरिडाईनं भारी गोल केला. डाव्याबाजूनं झेव्हियर हर्नांडेझच्या क्रॉसवर उजव्या बाजूनं एरिडाईनं गोल केला. त्यानं टोलावलेल्या चेंडूला इतका वेगही नव्हता, परंतु नॉर्थ ईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचूकडून चूक झाली अन् ओदिशानं २-० अशी आघाडी घेतली.
पुन्हा एकदा नॉर्थ ईस्टच्या सुहैरनं हेडरद्वारे गोल करण्याची संधी गमावली. २६व्या मिनिटाला एरिडाईकडून तिसरा गोल जवळपास झालाच होता, पण यावेळी नशीब नॉर्थ ईस्टच्या बाजूनं होतं. ३१ व्या मिनिटाला प्रोवत लाक्रानं ओदिशाचा गोलरक्षक अर्षदीप सिंगला चकवलंच होतं, पण त्यानं टोलावलेला चेंडू गोलपोस्टला लागून माघारी फिरला. नॉर्थ ईस्टचे खेळाडू या हुकलेल्या संधीनं निराश दिसले. पहिल्या हाफमध्ये नॉर्थ ईस्टकडून १-२ प्रयत्न सोडल्यास संपूर्ण हाफवर ओदिशाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. विशेष करून ओदिशाच्या मिडफिल्डनं उत्तम खेळ केला. एरिडाईचा खेळ हा मिडफिल्डच्या खेळाडूंच्या उत्तम खेळाला दादच ठरला. पहिल्या हाफच्या अखेरच्या काही मिनिटांत मिर्शादनं ओदिशाचे दोन प्रयत्न अपयशी ठरवले अन्यथा ही आघाडी ४-० अशी मजबूत झाली असती.
ब्रेकनंतर ओदिशाचा खेळ आणखी उंचवला. एरिडाई नॉर्थ ईस्टच्या बचावपटूंसाठी डोकेदुखी ठरताना दिसला. ४८व्या मिनिटाला एरिडाईनं आणखी एक गोल करण्याची संधी तयार केली अन् त्याच्या पासवर झेव्हियर हर्नांडेझनं वेगानं चेंडू गोलजाळीच्या दिशेनं भिरकावला, परंतु यावेळेस मिर्शादकडून चूक झाली नाही. त्यानं डाईव्ह घेत हा गोल अडवला. ५१व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टच्या मार्गात पुन्हा गोलखांब्यानं व्यत्यय आणला. कर्णधार हर्नान सांतानानं गोल बॉक्सबाहेरून मारलेला चेंडू गोलखांब्यावर आदळून बाहेर गेला. ५८व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टकडून आणखी एक प्रयत्न आला आणि मोहम्मद इर्शादचा प्रयत्न असफल राहिला. सातत्यानं प्रयत्न करूनही अपयश येत असल्यानं नॉर्थ ईस्टचे खेळाडू निराश झाले होते.
६२व्या मिनिटाला हर्नांडेझनं लाँग रेंजवरून गोलचा प्रयत्न केला, परंतु चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळून पास झाला. ६८व्या मिनिटाला तर नंदकुमार सेकर आणि गोलरक्षक मिर्शाद असा वन ऑन वन सामना होऊनही ओदिशाला ही आघाडी वाढवता आली नाही. मिर्शादनं सुरेख बचाव केला. नॉर्थ ईस्टनं पहिल्या हाफच्या तुलनेत मध्यंतरानंतर ओदिशाला तोडीसतोड उत्तर दिले. पण, त्यांची गोलपाटी ही कोरीच राहिली. अखेरच्या १५ मिनिटांत नॉर्थ ईस्टचा खेळ आणखी वेगवान झालेला पाहायला मिळाला. नॉर्थ ईस्टकडून ८७व्या मिनटाला राल्टेनं गोल केला खरा, पंरतु पंचांनी ऑफ साईड दिल्यानं हा गोल नाकारण्यात आला. ओदिशानं हा सामना २-० असा जिंकला.