दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नागपूर :- आश्चर्याची बाब १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरल्याचे दिसून आले. पक्षावर खरोखरच इतके मोठे संकट आले होते का, की खोपडे यांना कोरोनाच्या नियमावलीचे भानदेखील राहिले नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
१३ जानेवारी रोजी खोपडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनीच सोशल माध्यमांवरून सर्वांना ती माहिती दिली. त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते. मंगळवारी भाजपतर्फे सुभाष पुतळा ते लकडगंज पोलीस ठाण्यापर्यंत छोटेखानी रॅली काढण्यात आली. यात कृष्णा खोपडे सहभागी झाले होते. यावेळी शंभराहून अधिक कार्यकर्तेदेखील होते.
मी १२ जानेवारी रोजी केलेल्या कोरोना चाचणीनंतर १३ तारखेला माझा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मी पाच दिवस गृहविलगीकरणातच होतो. मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी संपर्क साधला. कुठलीच लक्षणे नसतील तर तीन दिवसानंतर तुम्ही बाहेर पडू शकता, असे त्यांनी सांगितले होते. पाच दिवस घरीच राहिलो. चिलकरांना मंगळवारी सकाळीदेखील फोन केला. बाहेर निघण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याने मी आंदोलनात सहभागी झालो, अशी भूमिका खोपडे यांनी मांडली