
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे :- 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून एका चार वर्षीय अल्पवयीन मुलाचं अज्ञातानं अपहरण केलं होतं. अपहरणकर्त्याने गोड बोलून संबंधित चिमुकल्याला दुचाकीवर बसवून घेऊन गेले होते. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चिमुकल्याचं अपहरण झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची अवस्था बेहाल झाली होती. अपहरण झाल्यानंतर अखेर 9 दिवसांनी संबंधित चिमुकला सापडला आहे.
स्वर्णव सतीश चव्हाण उर्फ डुग्गू असं या चार वर्षीय मुलाचं नाव आहे. तो 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या आपल्या एका लहानग्या मित्रासोबत शाळेत जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणानं त्याचं अपहरण केलं आहे. अपहरण होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही अपहरणकर्त्यांचा खंडणीसाठी कोणताही फोन आला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं होतं. आज अखेर नऊ दिवसांनी चिमुकला सापडला आहे. बालेवाडी परिसरात अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा आज 9 दिवसानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात सापडला आहे.
डॉक्टर दाम्पत्याच्या या मुलाला पोलिसांनी शोधून काढलं आहे. घटनेचा बोभाटा झाल्यानंतर घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी स्वत:च त्याची सुटका करून पळ काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. स्वर्णवचं अपहरण कुणी केलं? आणि 9 दिवस तो कुठे होता? याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.