
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतीनीधी
महेश गोरे
होळी(लोहारा) :- प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय व ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन यांच्या वतीने दि. १५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यातील उपक्रमांचा भाग म्हणून आज (दि.१९) रोजी लोहारा तालुक्यातील होळी या गावातून ग्रंथदिंडी फिरवण्यात आली. ग्रंथदिंडीच्या माधम्यातून गावकऱ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत जागृती निर्माण करण्यात आली. होळी येथील स्वामी विवेकानंद भवन, ग्रामपंचायत कार्यालय, विट्ठल-रुक्मिणी मंदिर, आण्णाभाऊ साठे चौक, आण्णाभाऊ सांस्कृतिक भवन या मार्गे ग्रंथदिंडी विद्यार्थी व नागरीकांच्या उपस्थितीत फिरवण्यात आली.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयात ग्रंथदिंडीला विश्राम देवून उपस्थित समूदायाला वाचन संस्कृती रुजवण्याचे महत्व पटवून देण्यात आले. मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ओमभैय्या बिराजदार यांनी भूषविले. यावेळी कविवर्य प्रमोद माने सर, शिक्षक करण बाबळसुरे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना भक्कम समाज बांधणीसाठी वाचन कसे महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर पंधरवड्यातील उपक्रमांतर्गत उमरगा शहरातून काढलेल्या पुस्तक पालखीत जमलेली पुस्तके होळी येथील वाचनालयाला देण्यात आली. ही पुस्तके वाचनालयाच्या नोंदवहीत खतवून वाचकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर वाचनालयामार्फत यापूर्वी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रत्येकी रु.१०१/- चे मानधनपर बक्षिसही देण्यात आले.
वाचनालय व फाऊंडेशनच्या वाचन संस्कृती रुजवण्यासाठीच्या धडपडीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
होळीतील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, केशवजी सरवदे, व्यंकट(आप्पा) जाधव व कृष्णा सरवदे यांनी परिश्रम घेतले. होळीनंतर काळ निंबाळा, कदमापूर, कोळसूर(गुं), बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणी पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी दिली.