
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- प्रजासत्ताकदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हा नेहरु स्टेडीयमवर बुधवार,दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनीटे यावेळी आयोजिण्यात आला आहे.मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे दिले.
प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने आढावा बैठक घेण्यात आली,त्यावेळी ते बोलत होते.महसूल, पोलीस,महापालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,शिक्षण विभाग,माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री.बिजवल म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन समारंभ होणार आहे.मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणे,रंगरंगोटी,कुंड्या ठेवणे,पताका लावणे,गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभे राहण्यासाठी चौकट रंगविणे आदी कामे नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.ध्वजवंदन समितीने ध्वजस्तंभ,राष्ट्रध्वज,ध्वजाला मानवंदना,पोलीस पथक,बँड पथकाची नियुक्ती आदी कामे लवकर पूर्ण करुन घ्यावीत,अशा सूचना श्री.बिजवल यांनी बैठकीत दिल्यात.
उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालयी अनुक्रमे प्रांत अधिकारी व तहसीलदार आणि ग्रामपंचायत मुख्यालय येथे सरपंच किंवा गाव प्रमुख हे ध्वजारोहण करतील.
स्थानिक लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्यसैनिक,शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स,सफाई कामगार,आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करावे.कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताकदिनाचा संपूर्ण कार्यक्रम भौतिक अंतरासंदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल,याची काटेकोर अमंलबजावणी करण्याचे यावेळी सुचित करण्यात आले.