दैनिक चालु वार्ता
लोणखेडा सर्कल प्रतिनिधी
हिम्मत बागुल
लोणखेडा :- दि. 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येत असलेल्या 12 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमात इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांमार्फत “संकल्प माझा-लोकशाही बळकटीचा” हा संकल्प पत्र उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 5 वी ते 12 वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने जो संकल्प पत्राचा नमुना दिलेला आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात सुंदर पध्दतीने हे संकल्प पत्र कागदावर लिहून ते शाळेत जमा करावयाचे आहे. सदर संकल्प पत्र मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात येणार आहे. या उपक्रमात लाखो विद्यार्थी सहभागी होणार असून या निमित्ताने त्यांची कुटूंबे राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रवाहाशी जोडली जाणार आहेत. हा एक अभिनव उपक्रम असून सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच शिक्षकवृंद, शिक्षण विभाग यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.