
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- विक्रमगड मध्ये शासकीय कार्यालयासाठी जागाच उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला होता.त्याला आता यश आले असून विक्रमगड शहरापासून हाकेच्या अंतरावरील जलसंपदा विभागाची जागा मंत्री पाटील यांनी शासकीय कार्यालयांना उपलब्ध करून दिल्याने त्यांचे विक्रमगडकरांकडू अभिनंदन होत आहे.
ज्या कार्यालयात जनतेची कामे होतात ती कार्यालयेच जुनी मोडकळीस आलेले असतील तर कारभार होणार कसा तसेच अनेक कार्यालये जागेअभावी लांब वसलेली तर कुठे अजूनही भाडेतत्त्वावर चालत असल्याने सर्व कार्यालये एकाच छताखाली यावीत,लोकांना सोयीस्कर पडावे यासाठी आमदार सुनील भुसारा पहिल्यापासूनच आग्रही होते.जव्हार,मोखाडा,वाडा व विक्रमगड तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालये ही स्वातंत्र्यपूर्व इमारतीत आजही आहेत.मात्र मोखाडा तहसील कार्यालय शासकीय जागेत भव्य-दिव्य झालेच.जव्हार तहसील कार्यालयाचे हे काम वेगाने सुरू असून लवकरच त्याची उभारणी होईल.
मात्र विक्रमगड तालुक्यात भव्य असे कार्यालय बांधण्यासाठी जगात उपलब्ध होत नव्हती अशा वेळी जलसंपदा विभागाची जागा असल्याची माहिती आमदार सुनील भुसारा यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याबाबत पाठपुरावा सुरू केला.पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना मंत्री जयंत पाटील यांना त्याबाबत सांगितले व अनेकदा भेटीअंति त्याबाबत आग्रही मागणी केली.आमदार भुसारा यांच्या मागणीस्तव तब्बल दोन हेक्टर जागा जलसंपदा विभागाने शासकीय कार्यालयांना दिल्याने विक्रमगड मधील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.
याबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही नियोजन समितीच्या बैठकीत अभिनंदन केले.यामुळे आता विक्रमगड तालुक्यातील सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असून विक्रमगड तालुक्यातील बसस्थानकाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे असे आमदार भुसारा यांनी सांगितले.तसेच मोखाड्यात ही भव्य असे बसस्थानक,पंचायत समिती बांधणे या कामांचा पाठपुरावा सुरू असून त्याला लवकरच यश मिळेल असा आशावाद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.