
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
कर्जुले हर्या :- गुरुवार दि.२०रोजी संध्याकाळी ६वा.३०मिनिटांनी नगर-कल्याण हायवेवर कर्जुले हर्या घाटात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या टेंपो आणि स्विफ्ट कार यांच्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्यांची वाहतूक करणारा टेंपो क्रमांक MH 04 KF 0701हा आळेफाट्याकडून नगरच्या दिशेने जात असताना कर्जुले हर्या घाटातील अवघड वळणावर नगरवरुन कल्याण च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक MH 04 HM0504 यांची समोरासमोर जोराची धडक झाली.
ही धडक एवढी जोरात होती की स्विफ्टने टेंपोला दहा ते बारा फूट पाठिमागे ढकलले.स्विफ्टच्या ड्रायव्हर चे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.या अपघातात कारमधील अशोक सोनवणे रा.भादली,ता.वैजापूर हे जागीच ठार झाले तर प्रशांत निकम रा.चिकटगाव,ता.वैजापूर आणि लक्ष्मण सोनवणे रा.भादली,ता.वैजापूर हे दोघेजण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री गवळी, पोलिस कॉन्स्टेबल निवृत्ती साळवे, पोलिस मित्र अभिजित जाधव व संजय मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील दवाखान्यात पाठविण्यास मदत केली.क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने दूर करण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र स्थानिक लोकांच्या मदतीने वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
नगर-कल्याण नॅशनल हायवे क्र.61धोकादायक वळणांमुळे जिवघेणा ठरत आहे.हा महामार्ग बहुतांशी काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र या महामार्गावरील अनेक ठिकाणी धोकादायक वळणे तशीच आहेत.टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौक व कासारे फाट्याजवळील कर्जुले हर्या घाटातील अवघड वळण हे धोकादायक अपघात क्षेत्र आहे.
या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात होऊन कितीतरी निष्पाप बळी गेलेले आहेत.महामार्ग विभागाने ही धोकादायक वळणे काढणं गरजेचं आहे तरंच अपघातांचे प्रमाण कमी होईल अन्यथा दर दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने होणा-या अपघातांमुळे आणखी किती लोकांचे बळी घेणार असा संतप्त सवाल स्थानिकांमधून केला जातोय.