
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ रोमांचकारी आहे.त्यात त्याग आणि बलिदान यांचा इतिहास आहे. प्रबोधनाची चळवळ देशभर पसरवणाऱ्या महापुरुषांचा त्यात समावेश आहे.आपल्या कर्तृत्ववाने, पराक्रमाने ज्या लोकांनी इतिहास घडविला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नवीन पिढीला व्हावी,त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व त्यांच्या सारखे असामान्य कार्य नवीन पिढीच्या हातून घडले जावे,व पारतंत्र्याच्या जुलुमी, गुलामगिरीतून आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्या करीता प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ नये, यासाठीच हा लेखन प्रपंच,आज महानायक नेताजीची जयंती आहे, “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” असे का म्हणतात, याची प्रचिती नेताजी मुळे आली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अनेक वीरांच्या त्यागातून,साहसातून, बलिदानातून रचला गेला आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशप्रेमाने भारावून गेलेले महानायक म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस होय, स्वतः स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिलेच आय, सी, एस, अधिकारी होते, या महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे आई प्रभादेवी व वडील जानकीनाथ यांच्या पोटी झाला, त्यांचे घराणे श्रीमंत होते,सुभाषबाबू लहानपणापासूनच हुशार व स्वाभिमानी होते, शाळा शिकते वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी दाखविली होती, मुख्याध्यापक वेणीमाधव यांनी सुभाषबाबूं वर चांगले संस्कार केले होते.
१९१३ मध्ये कलकत्ता येथे सुभाषबाबू मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, नंतर ते कलकत्ता येथीलच प्रेसिडेन्सी काॅलेज मध्ये शिक्षण घेतले, तेथेच त्यांनी स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्या पुस्तकांचे वाचन करू लागले, तेव्हा त्यांच्या मनात युवकां विषयीची आपुलकी व आस्था निर्माण झाली, काॅलेज मध्ये असते वेळी युरोपियन प्रोफेसरांनी भारतीय हिंदी विद्यार्थ्यांना तुच्छतेने धक्काबुक्की केली, यांचा परिणाम असा झाला की शेवटी प्राचार्यांनी त्या प्रोफेसरला बडतर्फ केले, एवढा स्वाभिमान नेताजींना होता, अन्याय करणाऱ्यांची त्यांनी कधीही गय केली नाही, वडीलांनी सुभाषबाबूंना आय, सी एस होण्यासाठी इंग्लंडला पाठवून दिले, ब्रिटिशांच्या काळातील परीक्षा चौथ्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.
ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत बैसाखीच्या सणाला जमलेल्या शेकडो निरपराध लोकांवर ‘जनरल ओडवायर ‘यांनी दिलेल्या आदेशानुसार ‘जनरल डायरने’ बेछूट गोळीबार सुरू केला त्यामुळे शेकडो निष्पाप लोक मरण पावले,याचा निषेध म्हणून महानायक सुभाषबाबूंनी भारतमंत्री माँटेग्यू यांच्या कडे नोकरीचा राजीनामा पाठवून देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले, त्याच वेळी गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांनी दिलेल्या ‘सर ‘ या पदवीचा त्याग केला, ब्रिटिशां सरकारनी सुभाषबाबू यांना मंडालेच्या तुरुंगात टाकले, पुढे ते तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुणे येथे तरूणांच्या परिषदेसाठी आले व युवकांना मार्गदर्शन केले, सिंहगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्फूर्तिदायी इतिहास समजावून घेतले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, ब्रिटिशांच्या जुलुमातून आपली सुटका व्हावी असे त्यांना वाटत होते, मातृभूमीच्या मुक्तीसाठी आणि रक्षणासाठी यापुढे आपले सर्वस्व अर्पण करायचे असे त्यांनी ठरविले, महानायक नेताजींना अनेक वेळा तुरुंगात जावे लागत होते,नेताजी बरोबर चिंतरंजनदास , मौलाना आझाद, लोकमान्य टिळक, हेमंतकुमार, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, यांच्या ही बैठका होत असत, नेताजीनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने भारतीय समाजाला एकत्रित ठेवण्याचे कौशल्य त्यांच्या कडे होते, त्यामुळेच राष्ट्रीय सभेचे दोन वेळा अध्यक्षपद त्यांच्या कडे चालून आले, याच संधीचा फायदा घेऊन भारतमातेला स्वंतत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली, आणि तरूणांना ते उद्देशून म्हणाले,” तुम मुझे खून दो,,मै तुम्हे आजादी दुंगा ,”काही ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले, त्यामुळे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, पण सतत ते देशहिताला महत्त्व दिले, त्यासाठी त्यांना ११ वेळा तुरुंगात जावे लागले.
आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी दि १ ऑगस्ट १९३९ ला त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा स्वंतत्र नवीन पक्ष स्थापन केला,याच नावाने ‘साप्ताहिक ‘ही सुरू केले,नेताजीनी भारतीय जनतेला स्पष्ट पणे सांगितले , भारतमातेला दास्य शृंखलेतून मुक्त करण्यासाठी पारतंत्र्याची बेडी आपण तोडूया,तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून नजरकैदेत ठेवले होते, पंरतु वेषांतर करून ‘झियाउदीन पठाण’ असे नाव धारण करून नेताजी जर्मनीला पोहोचले, तेथे आझाद हिंद रेडियो केंद्र सुरू केले, या रेडिओ केंद्रावरून त्यांनी भारतीय जनतेला सशस्त्र लढयात भाग घेण्याचे आवाहन केले, त्यावेळी रासबिहारी बोस यांनी नेताजीना जपानला येण्याची विनंती केली, त्यानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस जपानला गेले तेथे त्यांना ‘आझाद हिंद सेनेचे’ नेतृत्व देण्यात आले.
आपल्या सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी ‘चलो दिल्ली’ ही घोषणा दिली,व कदम कदम बढाय जा हे “समरगीत गायले गेले, “त्यामुळे संपूर्ण भारतीयाच्या ,रोमारोमांत व मनात सुभाषबाबूंचे अनमोल विचार सतत घोळत होते, देशसेवा करतेवेळी नेताजींनी इटली मध्ये जाऊन बेनिटो मुसोलिनी व दि २९ मे १९४१ ला त्यांनी जर्मनीचे सर्वेसर्वा ॲडाॅल्फ हिटलरची भेट घेतली होती, जगात १९३९ ते १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू होते, तर भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी नेताजींची धडपड चालूच होती, भारतीय स्त्रीला ‘चूल आणि मूल ‘सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य नेताजींनी केले,’ राणी झाशी रेजिमेंट’ ही महिलांची एक स्वतंत्र तुकडी स्थापन करण्यात आली,या तुकडीचे नेतृत्व ‘लक्ष्मी स्वामीनाथन’ यांच्या कडे दिले.
या झाशीची राणी पथकाच्या प्रमुख होत्या, आझाद हिंद सेनेने व जपानी लष्कराने माॅवडाॅक,कोहिमा ही ठाणी जिंकून घेतले,इंफाळ जिंकून घेतेवेळी नैसर्गिक परिस्थिती मुळे यश मिळाले नाही,आणि जपानने माघार घेतली, तरीही झाशी पथकाने जीवाचे रान करून पुरूषांच्या बरोबरीने धैर्य, शौर्य गाजवून दाखविल्या मुळे त्या इतिहासात अजरामर झाल्या, आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली आणि त्याला अनुक्रमे ‘शहीद बेट व ‘ स्वराज्य बेट’असे नामकरण केले, प्रेमकुमार सहगल, डॉ लक्ष्मी स्वामीनाथन, जगन्नाथ राव भोसले, शाहनवाज खान हे नेताजीचे जीवलग सहकारी होते, जयहिंदची घोषणा देणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक व आझाद हिंद फौजेचे सरसेनापती हे नेताजी होते, म्हणून महात्मा गांधीनी त्यांना ‘देशभक्ताचा देशभक्त’ ही प्रेरणादायी उपाधी दिली.
त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरले, आपली सत्ता भारतात फार काळ टिकणार नाही, यांची जाणीव तेव्हा ब्रिटिशाना झाली, सदैव क्रांती कार्य करून देशाला ब्रिटिशांच्या जुलुमी जोखडातून मोकळे करण्याचा प्रयत्न नेताजी करत होते. अशा या देशभक्त महानायकांचा १२५ व्या जयंती पासून’पराक्रम दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे,त्यांनी इंडियन स्ट्रगल(भारतीय संघर्ष) हा ग्रंथ लिहिला,भारताच्या इतिहासात सर्वात मोठे आजपर्यंत गुढ उकलत नसलेले अनुत्तरित रहस्य म्हणजे नेताजींचे निधन होय, अनेक आयोग नेमले गेले,पण आजही अनेक मतमतांतरे चालूच आहेत, १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचे विमान अपघातात निधन झाले, “जे देशासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले” सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार ।ज्योतीसम जीवन जगले । ते अमर हुतात्मे झाले असे वर्णन कवी वि,म,कुलकर्णी करतात.
भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना मरणोत्तर,’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला.पण त्यांच्या कुटुंबियांनी तो स्वीकारला नाही, अशा या महानायकाच्या विभुतीस विनम्रपणे अभिवादन.
साहित्यिक
प्रा, विठ्ठल गणपतराव बरसमवाड
खैरकावाडी, ता. मुखेड.जि.नांदेड